सनातन वैदिक धर्मपरंपरेचे शास्त्रशुद्ध चिंतन, संशोधन आणि संवर्धन तसेच धर्मशास्त्राच्या आधारे विविध धार्मिक विषयांवर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये ‘ज्ञानकुंभ’ विद्वत संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय ज्ञानमंथनात देशभरातील संस्कृत विद्यापीठांमधील संशोधक, धर्मशास्त्रज्ञ, वेदशास्त्रज्ञ, आचार्य, संत-महंत, धर्माचार्य तसेच विविध आखाडे आणि संप्रदायांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
श्रीमहंत वेदाचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्या संकल्पनेतून २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी ‘ज्ञानकुंभ २०२६’ या विद्वत् संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड येथील महर्षि पंचायतन सिद्धपीठम, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेडच्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी १० वाजता या संगोष्ठीला सुरुवात होणार आहे.
या ज्ञानकुंभामध्ये वेद, पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, धर्मशास्त्रे, ज्योतिषशास्त्र, दर्शनशास्त्र आणि इतिहास या विविध प्रमाणांच्या आधारे कुंभमेळा, हिंदू धर्म आणि संबंधित धार्मिक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महात्म्य, कुंभपर्वाचे धार्मिक व ज्योतिषीय आधार तसेच वैदिक आणि पुराणिक परंपरेतील तीर्थमहात्म्य यावर विद्वानांकडून विचारमंथन होणार आहे. यासोबतच विविध संप्रदाय आणि आखाड्यांच्या धार्मिक परंपरा, सनातन धर्मातील आचार-विचारांचे शास्त्रीय स्वरूप, कुंभ विधी आणि आधुनिक काळातील विविध धार्मिक प्रश्नांचे धर्मशास्त्रांच्या आधारे विवेचन यावरही शास्त्रार्थ होणार आहे.
हे ही वाचा:
तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराणमध्ये तीन तास चर्चा
महानदीतल्या खोल विहीरीत सापडला नैसर्गिक वायू
अमेरिकन जवानांनी बद्रीनाथ मंदिरासह जुनागढ किल्ल्याला दिली भेट
महाराष्ट्रासह चार राज्यांत विधान परिषद निवडणुकीचा बिगुल
नाशिक-त्र्यंबकेश्वर ही कुंभपरंपरेतील महत्त्वाची तीर्थभूमी असल्याने या ज्ञानकुंभाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भ असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या उपक्रमातून मिळणारे धर्मशास्त्रीय विद्वत् निर्णय आणि संदर्भ महाराष्ट्र शासन, कुंभमेळा प्राधिकरण, कुंभमेळा मंत्री, कुंभमेळा समन्वयक तसेच संबंधित प्रशासनासमोर सादर करण्याचेही नियोजन आहे.
