घरक्राईमनामासरकारी नोकरी, संपत्तीच्या लालसेपोटी मुलीनेच रचला आईच्या हत्येचा कट

सरकारी नोकरी, संपत्तीच्या लालसेपोटी मुलीनेच रचला आईच्या हत्येचा कट

७ लाखांची सुपारी देत अपघाताचा बनवला बनाव

राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी नोकरी आणि कौटुंबिक संपत्ती मिळवण्यासाठी एका २३ वर्षीय मुलीने स्वतःच्या आईच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या कटासाठी तब्बल ७ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. हत्येला रस्ता अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि सखोल तपासामुळे संपूर्ण कट उघडकीस आला.

मृत महिलेचे नाव नीरज शर्मा (वय ४५) असून त्या जयपूर न्यायालयात कनिष्ठ लिपिक (LDC) म्हणून कार्यरत होत्या. ३ जुलै रोजी त्या आपल्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून घरी परतत असताना प्रतापनगर परिसरात भरधाव स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की त्यांचे शरीर जवळपास १०० फूट दूर फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत असले तरी तपासात तो पूर्वनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, नीरज शर्मा यांचे पती विजय शर्मा यांचे सुमारे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर नीरज शर्मा यांना न्यायालयात सरकारी नोकरी मिळाली. मात्र ही नोकरी स्वतःला मिळावी, अशी मुलगी आयुषी शर्माची इच्छा होती. आईने नोकरी स्वीकारल्यानंतर आई-मुलीमधील मतभेद अधिकच वाढले. याचबरोबर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोघींमध्ये कौटुंबिक संपत्तीवरूनही वाद सुरू होता.

तपासात आयुषीने तिचा काका मोहन स्वरूप शर्मा आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांच्यासोबत मिळून कट रचल्याचे समोर आले आहे. या तिघांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा याला ७ लाख रुपयांची सुपारी देऊन नीरज शर्मा यांची हत्या करण्याची योजना आखली. आरोपींनी जवळपास महिनाभर नीरज यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यांच्या येण्या-जाण्याची माहिती सातत्याने एकमेकांना दिली जात होती.

पोलिसांनी सांगितले की, सुमारे महिनाभरापूर्वी आरोपींनी भाड्याने घेतलेल्या थार गाडीद्वारे नीरज शर्मा यांना चिरडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या वेळी त्या थोडक्यात बचावल्या आणि त्यांना संशयही आला होता. त्यानंतर आरोपींनी पुन्हा नियोजन करत स्कॉर्पिओचा वापर करून ३ जुलै रोजी त्यांची हत्या केली. घटनेनंतर आरोपींनी स्कॉर्पिओ टाकून मोटारसायकलवरून पळ काढला.

हे ही वाचा:

“भारत-पाक युद्ध अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते” ट्रम्प यांचा पुन्हा युद्ध थांबवल्याचा दावा

शांतता करार संपल्याच्या घोषणेनंतर अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले

कनेक्टिंग लिंकबाबतचा सगळा खोटारडेपणा समोर आला!

शिवसेनेचे मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, डॉक्टर, नर्सेसना केली मारहाण

नीरज शर्मा यांचे भाऊ राकेश शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत ही घटना अपघात नसून संशयास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी मुलगी आणि इतर नातेवाईकांकडून नीरज यांना संपत्तीसाठी सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले असता हा संपूर्ण कट उघड झाला. या प्रकरणात पोलिसांनी आयुषी शर्मा, मोहन स्वरूप शर्मा, मोहित शर्मा, आकाश शर्मा, अरविंद शर्मा, हेमंत शर्मा आणि रोहित जाटव यांना अटक केली आहे. तर या कटातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेला बलराम उर्फ रवी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत असून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि कटातील इतर संभाव्य सहभागींविषयीही चौकशी सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version