पोलिसांच्या गणवेषातल्या गुंडांनी लुटले, मुंबई सेंट्रलवरील घटना

सराफाला मुलीसमोर मारहाण, ३० हजार उकळले

पोलिसांच्या गणवेषातल्या गुंडांनी लुटले, मुंबई सेंट्रलवरील घटना

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर तीन बनावट गणवेषधारी पोलिसांचा कारनामा उघड झाला आहे. राजस्थानमधून आलेल्या सराफाला फलाटावरच थांबवून, मुलीसमोर शिवीगाळ करत त्यांनी मारहाण केली आणि तब्बल ३० हजार रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राजस्थानचा सराफ कुलदीप सोनी (३७) आपल्या कुटुंबासह सोन्याच्या प्रदर्शनासाठी मुंबईत आला होता. १० ऑगस्ट रोजी रात्री मुंबई सेंट्रलवरून परतीसाठी तो मुलगी व मेहुण्यासह फलाट क्रमांक ५ वर पोहोचला. त्यावेळी गणवेषातील तिघांनी त्याला थांबवले. बॅग तपासल्यावर त्यातून सोन्याचा बार व रोकड मिळताच त्यांनी चौकशीच्या बहाण्याने दमदाटी केली.

मुलीसमोरच मारहाण

सराफाकडे सोन्याच्या पावत्या असूनही पोलिस गणवेषधारी गुंडांनी त्याला शिवीगाळ करत चोप दिला. त्यानंतर फलाटाजवळच्या अंधाऱ्या खोलीत खेचून नेऊन अटक करण्याची धमकी दिली. ट्रेन सुटण्याची वेळ होताच, या तिघांनी त्याच्याकडील ३० हजार रुपये हिसकावले आणि सोडून दिले.

हे ही वाचा:

ट्रम्प यांच्या टॅरिफला उत्तर देण्यासाठी मोदी सरसावले!

राधाकृष्णन यांना दिलेली संधी हे चांगलेच पाऊल

दिल्लीत सीपी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट!

भटक्या कुत्र्यांवरील निर्णयाबद्दल मनोज बाजपेयी काय म्हणाले ?

जीआरपीकडे गुन्हा दाखल

घाबरलेल्या सराफाने राजस्थानला परत गेल्यावर थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याची तक्रार मुंबई सेंट्रल जीआरपीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११९ (१) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास रेल्वे गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांचा गणवेष घालूनच जर प्रवाशांची लूट होत असेल तर सामान्य प्रवासी नेमका कुणाकडे न्याय मागणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version