घरक्राईमनामागडचिरोलीत एकूण 14 लाखांचे बक्षीस असलेल्या चार माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोलीत एकूण 14 लाखांचे बक्षीस असलेल्या चार माओवाद्यांना कंठस्नान

पाच वर्षांत 91 माओवादी ठार, 128 अटकेत, 75 जणांनी आत्मसमर्पण

महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात तब्बल 48 तास चाललेल्या माओवादविरोधी तुफानी अभियानात गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. रक्तरंजित झालेल्या चकमकीत पीपीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह चार जहाल माओवादी ठार झाले. यांच्यावर एकूण 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. घटनास्थळावरून एस.एल.आर., दोन इन्सास व एक 303 रायफल, 92 जिवंत काडतुसे आणि तीन वॉकीटॉकी जप्त करण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे 25 ऑगस्ट रोजी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सी-60 च्या 20 तुकड्या आणि सीआरपीएफ क्यूएटीच्या दोन तुकड्या कोपर्शी जंगलात दाखल झाल्या. अवघड भूभाग आणि सततच्या पावसाला तोंड देत जवानांनी सलग दोन दिवस शोधमोहीम राबवली. 27 ऑगस्टला सकाळी माओवादी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू करत जवानांना ठार मारण्याचा व शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी शरण येण्याचे आवाहन केले, मात्र माओवादी आणखी आक्रमक झाले. प्रत्युत्तरादाखल जवानांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात आठ तासांच्या चकमकीनंतर चार माओवादी ठार करण्यात यश मिळाले.या मध्ये अहेरी दलमाचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख

1. मालु पदा (41, छत्तीसगड) – पीपीसीएम, कंपनी क्र. 10 दलम, बक्षीस 6 लाख, 8 गंभीर गुन्हे दाखल

2. क्रांती ऊर्फ जमुना हलामी (32, गडचिरोली) – कंपनी क्र. 10 सदस्य, बक्षीस 4 लाख, 27 गुन्हे दाखल

3. ज्योती कुंजाम (27, छत्तीसगड) – अहेरी दलम सदस्य, बक्षीस 2 लाख, 8 गुन्हे दाखल

4. मंगी मडकाम (22, छत्तीसगड) – गट्टा दलम सदस्य, बक्षीस 2 लाख, 3 गुन्हे दाखल

या कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, परिक्षेत्रीय उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सिआरपीएफ उप-महानिरीक्षक (अभियान) अजयकुमार शर्मा यांनी केले. तर प्रत्यक्ष नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांनी केले. सी-60 प्राणहिता प्रभारी अधिकारी सपोनि राहुल देवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे सन 2021 पासून आतापर्यंत 91 माओवादी ठार, 128 अटकेत आणि 75 जणांनी आत्मसमर्पण केले आहे. या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जवानांचे अभिनंदन केले. तसेच माओवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करत, गडचिरोलीत माओवादविरोधी मोहिम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version