दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टी कार्यकर्तीच्या वडिलांवर हल्ला केल्याच्या आरोपाप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. माहितीनुसार, स्वतंत्र भारद्वाज याच्यावर कॉकरोच जनता पार्टीशी संबंधित कार्यकर्ती निशू आझाद हिचे वडील संजय आझाद यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. जून महिन्यात जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान ही घटना घडली होती.
दिल्ली पोलिसांनी भारद्वाजला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला दिल्लीत आणून अटक करण्यात आली. कडकडडूमा न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर हजर केल्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हे ही वाचा:
२७ नोव्हेंबर ‘बालविवाह विरोधी दिवस’ म्हणून घोषित!
दिल्लीत रिपब्लिक चॅनेलच्या महिला पत्रकाराशी ‘कॉक्रोच’चे गैरवर्तन
S-400 खरेदीसाठी रशियासोबत ५० हजार कोटींची डील?
नेपाळमधील महाप्रलयातील मृतांचा आकडा १,३४४ वर
या प्रकरणाला एका व्हायरल पॉडकास्टनंतर मोठी प्रसिद्धी मिळाली. या पॉडकास्टमध्ये भारद्वाजने आंदोलकाच्या वडिलांवर हल्ला केल्याचा दावा केल्याचे समोर आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत भारद्वाजच्या अटकेची मागणी केली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एफआयआरमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे आणि धमकीशी संबंधित कलमेही जोडल्याचे वृत्त आहे. तसेच स्वतंत्रपणे POCSO कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, स्वतंत्र भारद्वाजने हल्ल्याचा आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला असून, आपण स्वसंरक्षणासाठी कृती केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.
