भाजपाचे ज्येष्ठ नेते भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी रविवारी १००व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करणारा ‘भारतरत्न लालकृष्ण अडवाणीजी : आयुष्याच्या शंभराव्या वर्षात’ हा लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अडवाणी यांची दोन वैशिष्ट्ये त्यांना नेहमीच इतर राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे ठरवत आली आहेत. त्यांची वैचारिक स्पष्टता आणि बौद्धिक प्रगल्भता ही ती दोन वैशिष्ट्ये असून, भारतीय राजकारणातील मोठ्या वर्गाकडून अनेक वर्षे मांडल्या जाणाऱ्या छद्म धर्मनिरपेक्षतेचा त्यांनी ज्या पद्धतीने पर्दाफाश केला, तेही महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
अडवाणी यांच्या आयुष्यातील शंभराव्या वर्षात पदार्पणानिमित्त रविवारी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या विशेष लेखात पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक प्रवासाचा आढावा घेतला. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकमेकांशी सहकार्य करत राजकारणात एक उल्लेखनीय उदाहरण निर्माण केले. या दोन्ही नेत्यांनी मिळून भारतीय राजकारणाची दिशा बदलली, असेही मोदी यांनी नमूद केले.
मोदी यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, अडवाणी यांची दोन वैशिष्ट्ये नेहमीच ठळकपणे दिसून आली. पहिले म्हणजे त्यांची वैचारिक स्पष्टता आणि बौद्धिक प्रगल्भता. त्यांच्या भाषणांमध्ये आणि लेखनातून हे गुण स्पष्टपणे दिसून येत होते. जनसंघ आणि भाजपच्या त्यांनी तयार केलेल्या ठरावांचे आजही वाचन करणे उपयुक्त ठरते. त्यांच्या मुलाखतीही नेहमीच अभ्यासपूर्ण, नेमक्या आणि परखड असायच्या.
हे ही वाचा:
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये नऊ वर्षांनंतर बाजार घसरला
त्रिपुरात बीएसएफ जवानांवरील हल्ल्यात महिलाही सामील
काँग्रेसच्या मनात आजही बाबरबद्दल आस्था!
दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय राजकारणातील मोठ्या वर्गाने अनेक वर्षे मांडलेल्या छद्म धर्मनिरपेक्षतेचा त्यांनी केलेला पर्दाफाश, असे मोदी यांनी ‘भारतरत्न लालकृष्ण अडवाणीजी : आयुष्याच्या शंभराव्या वर्षात’ या लेखात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ८ नोव्हेंबर रोजी अडवाणीजींचा वाढदिवस असून यंदा तो दिवाळीच्या सणासोबत आला आहे. प्रभू श्रीराम आणि दिव्यांशी संबंधित असलेल्या या सणाचे यंदा विशेष महत्त्व आहे. त्याचवेळी जनसंघाच्या स्थापनेला ७५ वर्षे, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचाही संदर्भ महत्त्वाचा आहे.
आधुनिक भारताच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण पर्वांशी ज्यांचे जीवन जोडले गेले आहे, अशा व्यक्ती फार कमी आहेत. अडवाणी यांचे जीवनही अशाच अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे, असे मोदी यांनी म्हटले.
अडवाणी यांचा जन्म देव दीपावलीच्या दिवशी झाला होता. १९४७ मध्ये तरुण वयात त्यांना सिंधमधील आपले परिचित जग सोडून यावे लागले. मात्र, कोणतीही कटुता मनात न ठेवता त्यांनी नव्याने आयुष्याची उभारणी केली. प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून सुरुवात करून पुढे जाण्याचा त्यांचा हा गुण संपूर्ण आयुष्यभर कायम राहिला, असे मोदी यांनी सांगितले.
जनसंघापासून भाजपच्या उभारणीपर्यंत महत्त्वाचे योगदान
अडवाणी यांनी जनसंघाला बळकट करण्यापासून ते भाजपच्या उभारणीपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या भाजप अध्यक्षपदाच्या कार्यकाळात १९८९ मध्ये काँग्रेसच्या लोकसभेतील जागांची संख्या ४०० वरून २०० पेक्षा खाली आली. तर १९९६ मध्ये भाजप प्रथमच लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष बनला, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
अडवाणी यांनी पक्षातील अनेक पिढ्यांमधील कार्यकर्त्यांना घडवले आणि ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वावर आधारित भाजपचा भक्कम पाया निर्माण केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून अडवाणी यांनी सुरुवातीला राजस्थानच्या विविध भागांत काम केले. त्यानंतर ते दिल्लीला आले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांनी जवळून काम करण्यास सुरुवात केली.
फाळणीनंतरच्या भीषण परिस्थितीतून सावरत असलेल्या दिल्लीमध्ये अडवाणी यांनी जनसंघ मजबूत करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. १९६७ मध्ये ते दिल्ली मेट्रोपॉलिटन कौन्सिलचे अध्यक्ष झाले. यावेळी त्यांनी दिवंगत विजय कुमार मल्होत्रा यांच्यासोबत काम केले.
१९७० मध्ये संसदीय कारकिर्दीला सुरुवात
१९७० मध्ये अडवाणी यांच्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात झाली. संसदेत त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे सर्वच राजकीय पक्षांमधून कौतुक झाले. खासदार म्हणून तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर असतानाही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
संसदेतील जबाबदाऱ्या सांभाळतानाच अडवाणी देशभर प्रवास करून नागरिकांच्या भेटी घेत असत, असे मोदी यांनी सांगितले.
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीच्या आठवणी सांगताना मोदी म्हणाले की, अडवाणी यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी एक मतदारसंघ गांधीनगर होता. फाळणीनंतर अडवाणी यांचे वडील कच्छमध्ये स्थायिक झाले होते. तसेच अडवाणी यांनी गुजरातमधून राज्यसभेचे खासदार म्हणूनही काम केले होते. त्यामुळे गांधीनगरमधून निवडणूक लढवणे त्यांच्यासाठी एका अर्थाने घरवापसीसारखे होते.
त्या काळात आपण भाजप संघटनेत काम करत होतो. अडवाणी यांचे निवडणुकीसाठीचे कागदपत्र तयार करण्यात आणि प्रचारादरम्यान त्यांना मदत करण्याची संधी मिळाली, असे मोदी यांनी सांगितले.
गांधीनगरच्या जनतेने अडवाणी यांना वारंवार संसदेत पाठवले. गांधीनगरचा मतदार म्हणून आपल्यालाही अनेकदा त्यांना मतदान करण्याची संधी मिळाली. आपल्या मतदारसंघासाठी अडवाणी यांनी घेतलेली काळजी आणि दिलेले लक्ष प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे, असेही मोदी म्हणाले.
आणीबाणीच्या काळात लोकशाही संरक्षणासाठी लढा
आणीबाणी हा अडवाणी यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता. लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी अग्रभागी राहून संघर्ष केला.
या काळातील अनुभव त्यांनी ‘अ प्रिझनर्स स्क्रॅप-बुक’ या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकातील ‘अ टेल ऑफ टू इमर्जन्सीज’ या भागात जून १९७५ पासून भारतात घडलेल्या घटनांमधील आणि १९३३ मध्ये नाझी जर्मनीत घडलेल्या घटनांमधील साम्य प्रभावीपणे स्पष्ट करण्यात आले आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
अडवाणी हे आक्रमक विरोधी पक्षनेते होते, त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट प्रशासकही होते. १९७७ मध्ये जनता सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयातील त्यांचे काम अत्यंत प्रभावी ठरल्याचे व्यापकपणे मान्य केले जाते.
उपपंतप्रधान आणि देशातील सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणून त्यांनी भारताची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुरक्षा दलांच्या जवानांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही आदराने स्मरणात ठेवले जातात. दहशतवादाविरोधातील त्यांच्या ठाम भूमिकेमुळे भारताला कठोर दहशतवादविरोधी कायदा मिळाल्याचेही मोदी यांनी म्हटले.
सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेने भारतीय राजकारणाला नवे वळण
अडवाणी यांच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाच्या घटनांपैकी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा ही एक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. या यात्रेमुळे भारतीय समाजाच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
या यात्रेच्या संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत सहभागी होण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे मोदी यांनी सांगितले. सोमनाथ येथे यात्रेच्या प्रारंभी उपस्थित राहणे हा आपल्यासाठी विशेष अनुभव होता.
रथयात्रेसाठी दीर्घकाळ प्रवास, शारीरिक क्षमता, थकवा सहन करण्याची ताकद आणि सातत्याने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता होती. अडवाणी यांनी या सर्व बाबतीत विलक्षण जिद्द दाखवली, असे मोदी म्हणाले.
बिहारमध्ये अडवाणी यांना अटक झाल्याचा आणि त्यानंतर गुजरातमध्ये भाजपने चिमणभाई पटेल सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा प्रसंगही मोदी यांनी आठवला. या निर्णयातून पक्षाच्या विचारसरणीशी आणि राम मंदिराच्या मुद्द्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला होता, असे त्यांनी म्हटले.
भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर उभारण्याची शपथ घेतली होती. अनेक वर्षांनंतर देशातील जनतेच्या आशीर्वादाने अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकार झाले, असे मोदी यांनी नमूद केले.
अडवाणी यांच्या साधेपणाचेही पंतप्रधानांकडून कौतुक
अडवाणी यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा साधेपणा. नवनिर्माण आंदोलनानंतर अडवाणी जुनागढ येथे गेले होते. तेथे त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे महिनाभर राहून विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी केली. त्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता, असे मोदी यांनी आठवले.
सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा म्हणजे काय, हे अडवाणी यांनी नेहमीच आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यांना वाचनाची विशेष आवड असून ते अत्यंत बारकाईने वर्तमानपत्रे वाचतात. त्यांच्या सहवासात राहिलेल्या व्यक्तींना याची जाणीव आहे, असे मोदी म्हणाले.
अडवाणी यांना चित्रपट आणि नाट्यकलेचीही विशेष आवड आहे. ते उत्साही चित्रपट समीक्षकही राहिले आहेत. इतिहास आणि त्याचे जतन करण्याची आवश्यकता याविषयीची त्यांची भूमिका ‘माय कंट्री माय लाइफ’ या पुस्तकातून स्पष्ट होते.
अडवाणी यांनी सिंधी संस्कृतीशी असलेले नातेही कायम जपले. लेहजवळ सिंधू दर्शन पूजेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आपण स्वतः अडवाणी आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत या पूजेला उपस्थित राहिलो होतो, अशी आठवणही मोदी यांनी सांगितली.
कमला अडवाणी यांच्या योगदानाचाही उल्लेख
अडवाणी यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांच्या पत्नी कमला अडवाणी यांचा उल्लेख करणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी म्हटले. अडवाणी यांच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात कमला अडवाणी यांनी त्यांना सातत्याने बळ आणि आधार दिला.
कराचीमध्ये लहानाचे मोठे होत असताना आपल्या आयुष्याचा प्रवास पुढे कोणत्या दिशेने जाईल, याची अडवाणी यांना कल्पनाही नसेल. त्यांच्या योगदानाची दखल घेत २०२४ मध्ये भारतातील जनतेच्या वतीने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
अडवाणी यांनी आयुष्याच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले असताना त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांनी आजवर ज्या प्रकारे देशाला प्रेरणा दिली, त्याचप्रमाणे पुढेही प्रेरणा देत राहावे, अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लेखाच्या शेवटी केली.
