घरक्राईमनामानागपुरात लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने १२ सराफांना धमकी

नागपुरात लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने १२ सराफांना धमकी

१० लाखांची खंडणी मागितली

नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांना लक्ष्य करत कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील तब्बल १२ सराफा व्यावसायिकांना टपालाद्वारे धमकीची पत्रे पाठवण्यात आली असून, प्रत्येकाकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने नागपुरातील सराफा बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळातच हा प्रकार घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इतवारी येथील प्रसिद्ध सराफा बाजारपेठेसह बजाजनगर परिसरातील व्यापाऱ्यांना ही धमकीची पत्रे मिळाली आहेत. विशेष म्हणजे, ही पत्रे साध्या कागदावर हाताने लिहिण्यात आली आहेत. पत्र पाठवणाऱ्याने आपण लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. खंडणीची रक्कम देण्यासाठी व्यापाऱ्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून, निर्धारित वेळेत पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याचेही परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
२०२४ची लोकसभा निवडणूकच बेकायदेशीर होती!

पोल पोझिशन मिळविल्याबद्दल हॅमिल्टन खुश

एका वर्षात भारतीय फलंदाजांनी मारले ४०० विक्रमी षटकार

ब्रिटिश दाम्पत्याला एवढी भावली देशी रिक्षा की थेट घेऊन गेले मायदेशी!

या प्रकारानंतर नागपूर जिल्हा सराफा व्यापारी संघटना सक्रिय झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. धमकीच्या पत्रांच्या प्रती पोलिसांकडे सादर करण्यात आल्या असून, संबंधित व्यापाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. धमकीची पत्रे नेमकी कोणी पाठवली आणि त्यामागे बिष्णोई टोळीचा प्रत्यक्ष सहभाग आहे की तिच्या नावाचा वापर करून कोणी खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत आहे, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, नागपुरात यापूर्वीही बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी देण्याचा प्रकार घडला होता. प्रतापनगर परिसरातील एका निवृत्त शिक्षकासह त्यांच्या कॅनडात राहणाऱ्या मुलीलाही धमकी देण्यात आली होती. त्यामुळे या घटनांमागे एखादी संघटित टोळी सक्रिय आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १२ सराफांना एकाच वेळी लक्ष्य करण्यात आल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या तपासातून या धमकीमागील नेमके सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version