भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ८ विकेट्स गमावून १९१ धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात एकूण ११ षटकार लगावले. यासह भारतीय संघाने २०२६ या वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार पूर्ण केले आहेत. हा ऐतिहासिक टप्पा गाठणारा भारतीय संघ जगातील पहिला संघ ठरला आहे.
यापूर्वी क्रिकेटच्या सर्वांत लहान प्रकारात कोणत्याही संघाला एका कॅलेंडर वर्षात ४०० षटकार लगावता आले नव्हते. विशेष म्हणजे, २०२६ मध्ये भारताने लगावलेल्या ४०० षटकारांपैकी १४२ षटकार न्यूझीलंडविरुद्ध आहेत. एका कॅलेंडर वर्षात एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे.
२०२६ मध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या संघांच्या यादीत भारतानंतर ऑस्ट्रियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रियाने यावर्षी खेळलेल्या २४ सामन्यांत एकूण २२४ षटकार लगावले आहेत. तर भारतीय संघाने ४० टी-२० सामन्यांत ४०० षटकारांची नोंद केली आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा संघ तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याने २०२६ मध्ये खेळलेल्या २१ सामन्यांत आतापर्यंत २२४ षटकार लगावले आहेत.
हे ही वाचा:
ब्रिटिश दाम्पत्याला एवढी भावली देशी रिक्षा की थेट घेऊन गेले मायदेशी!
भारतीय संघाकडून यावर्षी सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आहे. त्याने २०२६ मध्ये आतापर्यंत ८६ षटकार ठोकले आहेत. इशान किशन ६० षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर संजू सॅमसनने यावर्षी ५० षटकार लगावले असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
