विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या माध्यमातून गेले काही दिवस सुरू असलेल्या आंदोलनांना उत्तर देण्यासाठी भाजपाने मुंबईत एका मोर्चाचे आयोजन केले होते. लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव या अभियानाअंतर्गत पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या रिजिम चेंजच्या आवाहनाचा समाचार घेतला. लोकशाही व्यवस्था, संविधान आणि संस्थांना कमकुवत करून त्या उलथवून टाकण्याचा राहुल गांधी आणि काँग्रेसचा इरादा आहे. पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही रिजिम चेंज होऊ देणार नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केला.
बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेतील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत फडणवीस यांनी दावा केला की, या देशांमधील घटनात्मक बदल आणि सत्तापालट हे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत. भारतातही अशाच प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधक लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून या संस्था मोडीत काढण्याचे समर्थन करता येईल, असा आरोपही त्यांनी केला.
फडणवीस म्हणाले की, सरकार बदलणे म्हणजे लोकशाही निवडणुकांच्या माध्यमातून एका निवडून आलेल्या सरकारच्या जागी दुसरे सरकार आणणे होय. मात्र, ‘सत्ता परिवर्तन’ म्हणजे देशाची राजकीय व्यवस्था, संविधान आणि संस्थांमध्ये बदल घडवून आणणे होय. ते म्हणाले, “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सरकार बदलण्याचा अधिकार आहे. पण सत्ता परिवर्तनाचा अर्थ काय? याचा अर्थ देशाची राजकीय व्यवस्था बदलणे, संविधान बदलणे आणि देशात स्थापन झालेल्या सर्व संस्था बदलणे असा होतो.”
फडणवीस म्हणाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनाही सत्ता परिवर्तनाच्या मोहिमेला पाठिंबा दिला असल्याचे सांगत फडणवीस यांनी टीका केली. मात्र, सत्ता परिवर्तन या शब्दाचा अर्थही उद्धव ठाकरे यांना माहीत नसल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस सत्तेत असताना लोकशाही संस्था आणि संविधान कमकुवत करण्याचे काम करत होती, असा आरोप फडणवीस यांनी केला. विशेषतः तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये लागू केलेल्या आणीबाणीचा उल्लेख त्यांनी केला. इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाची आठवण करून देताना फडणवीस म्हणाले की, त्यानंतर काँग्रेसने घटनादुरुस्ती करून इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीला न्यायालयीन परीक्षणापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
रेवंत रेड्डी, तुम्ही तेलंगणाला काँग्रेस नेत्यांचे एटीएम बनवले!
भारतीय नागरिक असल्यासारखे वागू नका!
‘इंडी’ आघाडीच्या रॅलीमुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांना ११ हजार कोटींचा फटका
भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत पाच खेळाडूंवर नजर
आणीबाणीच्या काळात करण्यात आलेल्या घटनादुरुस्त्यांचाही त्यांनी उल्लेख केला. काँग्रेसने नागरिकांचे मूलभूत अधिकार मर्यादित केले आणि न्यायालयात जाण्याचा नागरिकांचा अधिकारही कमी केला, असा आरोप त्यांनी केला.
त्यानंतर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने हे बदल मागे घेतले आणि संविधानातील संरक्षणात्मक तरतुदी पुन्हा लागू केल्या, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला आर्थिक किंवा सामाजिक स्थितीचा विचार न करता मूलभूत अधिकारांची हमी दिली आहे.
“काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे नेते रिझर्व्ह बँक, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, संसद, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांसारख्या संस्थांची प्रतिमा पद्धतशीरपणे मलिन करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाविरोधात आंदोलन केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून न्यायालयीन संस्थेविरोधात आंदोलन करण्याऐवजी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे न्याय मागितला पाहिजे.
ते म्हणाले, राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात न्याय मागत नाहीत, तर त्याच न्यायालयाविरोधात आंदोलन करतात. देशाच्या इतिहासात असे कधीही घडलेले नाही. विरोधक लोकशाही संस्थांवरील जनतेचा विश्वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी पुन्हा केला.
राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, राजकीयदृष्ट्या शक्तिशाली असलेल्या इंदिरा गांधी यांनाही संविधान नष्ट करता आले नव्हते. ते म्हणाले, “राहुल गांधी, तुम्हाला संविधान नष्ट करण्याच्या प्रयत्नात यश आले नाही. इंदिरा गांधी या शक्तिशाली नेत्या होत्या, तरीही त्यांना संविधान नष्ट करता आले नाही. मग तुम्ही कोण आहात?”
या पदयात्रेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, राज्याचे मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, शिवसेनेचे नेते सचिन अहिर तसेच अनेक नेते सहभागी झाले होते.
