घरबिजनेसबँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने केली ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने केली ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

दोन हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. पारेख ऍल्युमिनेक्स लिमिटेड (पीएएल) शी संबंधित ५३.९५ कोटी रुपये किमतीच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता ईडीने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत.

ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयातील झोन-१ च्या माहितीनुसार, ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ५४६ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे तपास यंत्रणेने सांगितले.

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), मुंबई आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) आणि ईओबी मुंबई यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पारेख ऍल्युमिनेक्स लिमिटेड आणि अन्य आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि १२०-बी तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ईडीच्या तपासात असे समोर आले की, कंपनीने साठा आणि देणी यासंदर्भातील वाढवून दाखवलेल्या कागदपत्रांच्या आधारे बँकांच्या समूहाकडून (कन्सोर्टियम) कर्ज मिळवले होते. त्यानंतर कंपनीची कर्ज खाती अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) म्हणून घोषित करण्यात आली. या कर्जाची एकूण रक्कम दोन हजार २९६ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती.

हे ही वाचा:

भारतीय नागरिक असल्यासारखे वागू नका!

‘इंडी’ आघाडीच्या रॅलीमुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांना ११ हजार कोटींचा फटका

नागरी विमान वाहतूक क्षेत्रासाठी केंद्र सरकार आणणार नवीन नियम

पंजाबमध्ये ‘आप’ची साथ सोडणारे तीन नेते भाजपात

तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, या कथित आर्थिक घोटाळ्यात जेके शाह समूहानेही महत्त्वाची भूमिका बजावली. विविध संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून ११०.५४ कोटी रुपयांची गुन्ह्यातून मिळवलेली रक्कम इतरत्र वळवण्यास मदत करण्यात आली. ईडीने दावा केला आहे की, या निधीचा एक लाभार्थी ७०.२५ कोटी रुपयांचा फायदा मिळवण्यात यशस्वी झाला. ही रक्कम एकूण दोन हजार २९६.५८ कोटी रुपयांच्या कथित गुन्ह्यातून मिळवलेल्या उत्पन्नाचा भाग होती.

यापूर्वीही या प्रकरणात ४९३ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय ईडीने मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले असून, न्यायालयाने त्याची दखल घेतली आहे. ईडीच्या माहितीनुसार, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या समूहाला या कथित कटामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या बँक घोटाळ्यात सहभागी असलेल्या अन्य व्यक्ती आणि संस्थांची ओळख पटवण्यासाठी ईडी छाप्यांदरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करत आहे.

या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पैशांचा प्रवाह आणि इतर संभाव्य लाभार्थ्यांची भूमिका शोधण्यासाठी पुढील कारवाई केली जाणार असल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version