इंडिया आघाडीची रामलीला मैदानातील रॅली फ्लॉप शो ठरली, परंतु या आघाडीचे नेतृत्व मात्र आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे चालत आलेले आहे. तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही आता अपवाद उरलेला नाही. ममता आणि राहुल यांच्यात इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून जे शीतयुद्ध होते, ते शमले असल्याचे चित्र रामलीला मैदानावर दिसले. ममता यांनी माघार घेतली आहे. राहुल गांधी हेच आता इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील. हे काँग्रेसपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जास्त पथ्यावर पडणार आहे. रामलीला मैदानावरील सभेने मोदी यांच्यासाठी २०२९ च्या लोकसभा निवडणुकांचे मैदान साफ केले आहे.
रामलीला मैदानात झालेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीचे उद्दिष्ट स्पष्ट होते. हे काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन होते. या सभेच्या निमित्ताने विरोधकांना केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात संघर्षाची ठिणगी टाकायची होती. देशातील जनता मोदी सरकारच्या विरोधात उभी ठाकली आहे, असे चित्र निर्माण करायचे होते. भारतात अराजकपर्वाची सुरुवात करायची होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणायचा होता. सभा फ्लॉप झाल्यामुळे हे सगळे मनोरे कोसळले आहेत.
आपल्या पाठीशी सगळा देश आहे, या गैरसमजात राहुल गांधी यांनी या रॅलीची हाळी दिली थी. प्रत्यक्षात गर्दीअभावी ४० टक्के रामलीला मैदान मोकळे राहिल्यामुळे त्यांच्या पाठीशी जनता नाही, हे स्पष्ट झाले. प्रत्येक चॅनलवर चिखलाने भरलेले ४० टक्के मैदान मोकळे असल्याचे फूटेज लोकांनी पाहिले आहे. उर्वरित जागेवर लावलेल्या खुर्च्याही बऱ्याच रिकाम्या असल्याचे चॅनलवाल्यांनी दाखवले आहे. याचा फायदा भाजपाला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात जनमत नाही, यावर राहुल गांधी यांनी या सभेच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केले आहे. पुन्हा एकदा त्यांची करणी मोदींच्या पथ्यावर पडली आहे. एका बाजूला डरकाळ्या फोडणाऱ्या कॉकरोचचा बंदोबस्त झाला. मोदींना ब्लडप्रेशर तपासा असा सल्ला देणाऱ्यांचेच ब्लड प्रेशर वाढलेले आहे. अभिजीत दिपके केविलवाणा दिसतो आहे. सौरव दास याला मद्रास उच्च न्यायालयात बापाबाबत खुलासे करावे लागणार आहेत. रांका चिडीचुप आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या शिडातली हवा निघाली. त्यामुळे मोदींसाठी २०२९ चे मैदान साफ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कशात काय नसताना अभिरूप संसद आणि रामलीला मैदानावर भाषण ठोकण्याची संधी मिळाल्यामुळे नेहा बोरा मात्र सध्या खूश आहे. स्वाभाविक आहे. काँग्रेसच्या युवा नेत्यांना बाजूला सारून राहुल गांधी तिच्या लाँचिंगच्या मागे लागले आहेत. त्यांचे लाँचिंग पुन्हा एकदा रामलीला मैदानात एखाद्या रॉकेटसारखे कोसळले असले तरी राहुल गांधी नेहा बोरासाठी मात्र ताकद लावताना दिसतायत.
राहुल गांधी हा विरोधी पक्षांचा सर्वमान्य चेहरा बनणे हे काँग्रेसच्या नाही, तर भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. कारण आता राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे दावेदार असतील. गृहमंत्री अमित शहा तर त्यांना पंतप्रधान बनवून मोकळे झाले आहेत. काँग्रेस पक्षाने ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या मॉक पार्लमेंटचा संदर्भ घेऊन अमित शहा यांनी राहुल गांधींना आता तुम्ही मॉक पंतप्रधान बना, अशी टिप्पणी दिलेली आहे. त्यांच्या विधानाचा अर्थ स्पष्ट आहे. राहुल गांधी कधीही मोदींना मात देऊ शकणार नाहीत. त्यांना हरवू शकणार नाहीत. त्यामुळे मॉक पार्लमेंट आणि मॉक पंतप्रधान हेच त्यांचे भविष्य आहे.
विरोधकांना आता राहुल गांधी यांचे पालखी ओढणे भाग आहे, कारण इंडिया आघाडीत आता काँग्रेस हाच एकमेव शक्तिशाली पक्ष उरला आहे. असा पक्ष, ज्याची कर्नाटक, हिमाचल, केरळ या राज्यांत सत्ता आहे. तामिळनाडू, झारखंडमध्ये काँग्रेसचे मित्रपक्ष सत्तेवर आहेत. सत्ता असलेल्या राज्यांतून पक्ष पोसण्यासाठी, सभा, मोर्चे, आंदोलनासाठी पैसा येऊ शकतो. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव या आघाडीतील नेत्यांचे दुकान बंद झाले आहे. सत्ता असतानाही संघटनेसाठी पैसा खर्च करण्याची त्यांची दानत नव्हती. त्यातल्या त्यात बरी स्थिती आज समाजवादी पक्षाची आहे. सपाकडे लोकसभेचे ३७ खासदार आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्ते आणि संघटनेचेही बळ आहे. २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत सपा आणि भाजपा असा थेट मुकाबला होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून चांगली कामगिरी झाली असतानाही सपाला पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणतीही आशा नाही, कारण काँग्रेस नावाचा निखारा त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर अखिलेश यादव यांचा तेजस्वी यादव किंवा उद्धव ठाकरे होण्याची शक्यता मोठी आहे.
देशाचे नेतृत्व करण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची इंडिया आघाडीत प्रचंड चुरस होती. आता सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी नांगी टाकली आहे. सत्ता गेल्यामुळे आता त्यांच्याकडे पक्ष पोसण्यासाठी रसद नाही. हे सगळे जण राहुल यांच्या मागे फरफटत जाणार आहेत. अखेर सगळेच बुडणार आहेत, ही बाब स्पष्ट आहे. ममता यांच्याकडे एका राज्याची सत्ता होती, पाठीशी खासदारांचे बळ होते. या दोन्ही गोष्टी आज उरल्या नाहीत. तीच स्थिती उद्धव ठाकरे यांची आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाची स्वप्ने दाखवली. आता ते उद्धव ठाकरेंचे नावही घेत नाहीत. सध्या ते राहुल गांधी यांच्या मागेपुढे करतायत. १ नोव्हेंबरच्या सभेसाठी खुल्या बसमधून जाताना पत्रकारांना ते म्हणाले, देशात क्रांती येते आहे. रिजिम चेंजची सुरुवात झालेली आहे. संजय राऊत हे खऱ्या अर्थाने भाजपाचे धुरंधर आहेत. आधी त्यांनी ठाकरेंचा बाजार उठवला, सध्या ते काँग्रेसचे १२ वाजवण्याच्या मोहिमेवर आहेत.
अवघ्या तीन वर्षांत इंडिया आघाडीच्या राजकारणात १८० अंशाच्या कोनात बदल झाला. इंडिया आघाडीची पहिली बैठक जून २०२३ मध्ये पाटण्यात झाली. तेव्हा जदयूचे नीतीश कुमार या आघाडीत होते. आघाडीची अधिकृत स्थापना १८ जुलै २०२३ रोजी झाली. तेव्हा अरविंद केजरीवाल यांचा पक्षही इंडिया आघाडीत होता. ममता बॅनर्जी, केजरीवाल, नीतीश कुमार ही सगळी मंडळी पंतप्रधान पदाची दावेदार होती. त्यांची स्पर्धा थेट राहुल गांधी यांच्यासोबत होती. त्यामुळे राहुल गांधी कुणालाच नको होते. राहुल गांधी यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यास केजरीवाल आणि ममता यांचा विरोध होता. त्यामुळे संमतीचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची अध्यक्षपदी निवड करून ममता, केजरीवाल या दोघांनी राहुल यांचा गेम केला.
तीन वर्षात हे चित्र आरपार बदलले आहे. केजरीवाल आता दिल्लीचे मुख्यमंत्री नाहीत, ते आघाडीतून बाहेर पडले आहेत. नीतीश कुमार यांनी आघाडीशी काडीमोड घेऊन भाजपाची साथ केली आहे. ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यामुळे त्यांच्यात आता कोणतीही दावेदारी करण्याचा जोर उरलेला नाही. रामलीला मैदानात बऱ्याच दिवसांनी समोर एवढी संख्या पाहून त्यांनी तिथेही मुस्लिमांचे जमेल तेवढे तुष्टीकरण करून घेतले. हिंदूंना काफर म्हणून त्या मोकळ्या झाल्या. पश्चिम बंगालमध्ये आता सभा वगैरे घेण्याची क्षमता यांच्यात उरलेली नाही.
२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीआधी भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा दिली होती. ही घोषणा अंगलट आली. भाजपाला साधे बहुमत सुद्धा मिळाले नाही. जे २०२४ मध्ये घडू शकले नाही, ते २०२९ मध्ये घडण्याची दाट शक्यता आहे. मोदींसाठी राहुल गांधी ताकदीने मेहनत घेताना दिसतायत.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
