मुंबई -मुंबईच्या आग्रीपाडा भागात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) मोठी कारवाई करत मेफेड्रॉन (एमडी) बनविणारी एक अवैध प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत तब्बल १४ किलो ४९३ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि लिक्वीड एमडी जप्त करण्यात आले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ५० कोटी ७४ लाख ३ हजार १०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
मामुनी सरकार, शोएब मंसुरी आणि सुफीयान मन्सूरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिटला २५ मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आग्रीपाडा परिसरात सापळा रचला होता. या परिसरातील एका घरात आरोपींनी ड्रग्ज बनवण्याची मोठी प्रयोगशाळा उभारल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकून तिथे तयार केलेले ड्रग्ज, कच्चा माल, रसायने आणि उपकरणे जप्त केली. विशेष म्हणजे, या ठिकाणी एक गावठी पिस्तुल आणि १९ जिवंत काडतुसेही सापडली आहेत, ज्याची किंमत ६४ हजार रुपये आहे.
हे ही वाचा:
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव
भारताच्या सुखोई विमानांना अत्याधुनिक संरक्षण कवच
पश्चिम बंगालमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून तृणमूलचे दोन नेते अटकेत
मिरारोडमध्ये कुर्बानीसाठी इमारतीतच बकऱ्यांसाठी शेड, लोकांचा तीव्र विरोध
याप्रकरणी कांदिवली एएनसी युनिटमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून, कलम ८ (क) सह २२ (क), २९ एनडीपीएस कायदा १९८५ आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींना २६ मे रोजी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपायुक्त (अंमली पदार्थ) नवनाथ ढवळे व साहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या नेतृत्वात कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, सपोनि उल्हास खोलम आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
