घरक्राईमनामामणिपूरमध्ये विषारी दारूने घेतला १५ जणांचा बळी

मणिपूरमध्ये विषारी दारूने घेतला १५ जणांचा बळी

१८० हून अधिक रुग्णालयात

मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात भेसळयुक्त दारू प्यायल्याने १५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत १८० हून अधिक जणांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान हे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. चकपीकारोंग उपविभाग आणि आसपासच्या परिसरात ही घटना घडली. दारूमधील मेथेनॉलमुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप वैद्यकीय आणि वैज्ञानिक तपासणीतून स्पष्ट झालेले नाही.

चंदेल जिल्हा पोलिसांनी सुरुवातीला आठ मृत्यूंची अधिकृत माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर मृतांचा आकडा १५ वर पोहोचल्याचे वृत्त आहे. काहींचा मृत्यू त्यांच्या घरी झाला, तर काहींनी रुग्णालयात नेत असताना किंवा उपचारादरम्यान प्राण गमावले. मृतांमध्ये ३२ ते ५० वयोगटातील पुरुषांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

दरम्यान, विषबाधेचा संशय असलेल्या रुग्णांवर इम्फाळमधील शिजा हॉस्पिटल आणि बाबिना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुरुवातीला शिजा हॉस्पिटलमध्ये १४० रुग्ण दाखल झाले होते. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हेमोडायलिसिस उपचार केले जात आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरही ताण निर्माण झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच, प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देत दोषींना लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले.

हे ही वाचा:

भारतात जन्मलेल्या दहशतवाद्यांपासून जम्मू-काश्मीर ३५ वर्षांनी मुक्त!

अय्यप्पा दीक्षा घेतलेल्या हिंदू कर्मचाऱ्याला टीसीएस कार्यालयात प्रवेश नाकारला

नवी मुंबई विमानतळावर विमानांची विक्रमी वाहतूक

धोनी सीएसके संघाची खरी ओळख!

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित दारू चंदेल जिल्ह्यात तयार करण्यात आलेली नसून ती शेजारच्या काकचिंग जिल्ह्यातील सुग्नू येथून आणण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना स्थानिक पातळीवर तयार केलेली किंवा संशयास्पद स्रोतांमधून मिळणारी दारू पिणे टाळण्याचे आवाहन केले आहे. उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दिसणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version