छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात १०० कुटुंबांतील सुमारे ५०० जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. कोरबा येथील घंटाघर ओपन थिएटरमध्ये आयोजित ‘हिंदुत्व रक्षक सन्मान सोहळ्या’त हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये कोरबा आणि सक्ती जिल्ह्यातील आदिवासी तसेच ग्रामीण भागातील कुटुंबांचा समावेश होता. भाजपचे नेते आणि अखिल भारतीय घरवापसी अभियानाचे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी या सर्वांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला महामंडलेश्वर स्वामी अनिलानंद महाराज आणि धर्मसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी घरवापसीचा सोहळा पार पडला. यावेळी धर्मांतरानंतर आलेले अनुभव काही महिलांनी उपस्थितांसमोर मांडले.
सक्ती जिल्ह्यातील समरीन बाई सतनामी यांनी सांगितले की, पतीच्या आजारपणामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. प्रार्थना, पवित्र पाणी आणि तेलामुळे पतीचा आजार बरा होईल, अशी त्यांना आशा होती. मात्र, पतीचे निधन झाल्यानंतर त्यांचा या गोष्टींवरील विश्वास उडाला. लता साहू यांनीही पतीच्या प्रकृतीत सुधारणा होईल, या अपेक्षेने धर्मांतर केल्याचे सांगितले. मात्र, त्याचा फायदा झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. हे अनुभव संबंधित महिलांनी कार्यक्रमात मांडले आहेत.
हे ही वाचा:
पुस्तकांचा खजिना वाचकांच्या भेटीला! मुंबई पुस्तक महोत्सवाला सुरुवात
विधानसभेसाठी पंजाबमध्ये भाजपा-अकाली दलाची युती
पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस
पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?
प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी त्यांचे वडील दिवंगत दिलीप सिंह जूदेव यांनी सुरू केलेले घरवापसी अभियान पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तर स्वामी अनिलानंद महाराज यांनी धार्मिक परंपरा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी समाजाने संघटित राहण्याचे आवाहन केले.
