वडोदरा येथील पारुल विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या ४५व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्ध्यांना नमवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. मुलींनी तेलंगणाचा २५-१५ असा १ डाव व १० गुणांनी धुव्वा उडवला, तर मुलांनी तामिळनाडूला ३३-२५ असे ८ गुण व १ मिनिट ४० सेकंद राखून पराभूत केले. मुलींच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमण आणि संरक्षणात वर्चस्व गाजवत सामन्यावर एकतर्फी पकड मिळवली, तर मुलांच्या संघाने चुरशीच्या लढतीत निर्णायक क्षणी आपली ताकद दाखवली. दोन्ही संघांच्या सांघिक कामगिरीने महाराष्ट्राच्या विजेतेपदाच्या मोहिमेला नवे बळ मिळाले आहे.
उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या मुलींनी तेलंगणाविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्ध्यांना बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडले. पहिल्या डावात महाराष्ट्राच्या आक्रमकांनी १८ गुण, तर बचावपटूंनी २ ड्रीम रन गुण मिळवत एकूण २० गुणांची कमाई केली. दुसऱ्या डावात आणखी ५ ड्रीम रन गुणांची भर पडल्याने महाराष्ट्राची गुणसंख्या २५ वर पोहोचली. तेलंगणाला दोन्ही डावांत मिळून केवळ १५ गुण करता आल्याने महाराष्ट्राने २५-१५ असा १ डाव व १० गुणांनी दणदणीत विजय साकारला. विजयी महाराष्ट्राकडून धनश्री कांकने अष्टपैलू चमक दाखवली. वेदिका तामखडे, धनश्री तामखडे, स्नेहा लामकाने, प्रणिती जगदाळे आणि श्वेता नवले यांनी चमकदार योगदान दिले.
हे ही वाचा:
पुस्तकांचा खजिना वाचकांच्या भेटीला! मुंबई पुस्तक महोत्सवाला सुरुवात
दीपस्तंभावर दिवा लावण्यावरील वादानंतर भाजपचे नेते नजरकैदेत?
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड
विधानसभेसाठी पंजाबमध्ये भाजपा-अकाली दलाची युती
मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात चुरशीची लढत रंगली. महाराष्ट्राने अखेर ३३-२५ असा ८ गुण व १ मिनिट ४० सेकंद राखून विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राकडून हारदया वसावे, पार्थ देवकाते, तबराज खान, सोत्या वळवीने, गौरव कुडाळे, समर्थ सावंत, समर्थ चव्हाण तर जितेंद्र वसावेने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
विजेतेपदाच्या दिशेने महाराष्ट्राची आगेकूच!
उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही विजयांनी महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. मुलींच्या आक्रमक खेळाला भक्कम संरक्षणाची जोड मिळाली, तर मुलांनी दबावाखालीही संयम राखत तामिळनाडूचे आव्हान परतवून लावले. आता उपांत्य फेरीत विजयाची हीच लय कायम राखून अंतिम फेरी गाठण्याचे आव्हान महाराष्ट्राच्या दोन्ही संघांसमोर असेल. राष्ट्रीय विजेतेपदाच्या दिशेने महाराष्ट्राची ही दुहेरी घोडदौड खो-खोप्रेमींच्या अपेक्षा निश्चितच उंचावणारी ठरली आहे.
