घरधर्म संस्कृतीअमरनाथ यात्रा २०२६: तीन दिवसांत ५६ हजारांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

अमरनाथ यात्रा २०२६: तीन दिवसांत ५६ हजारांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

बालटाल आणि नुनवान बेस कॅम्पमध्ये दररोज मोठ्या संख्येने भाविक होत आहेत दाखल

जम्मू-काश्मीरमध्ये ३ जुलैपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यात्रेच्या पहिल्या तीन दिवसांत ५६ हजार ९६१ भाविकांनी पवित्र अमरनाथ गुहेत बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे. रविवारी, यात्रेच्या तिसऱ्या दिवशी देशभरातून आलेल्या २४ हजार ६४८ भाविकांनी बालटाल आणि पहलगाम-चंदनवाडी या दोन्ही मार्गांद्वारे समुद्रसपाटीपासून ३ हजार ८८० मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेत दर्शन घेतले. याआधीच्या दोन दिवसांत ३२ हजार ३१३ भाविकांनी दर्शन घेतले होते.

प्रशासनाच्या माहितीनुसार, रविवारी हवामान अंशतः ढगाळ असले तरी दोन्ही मार्गांवर यात्रा सुरळीत सुरू होती. दर्शनानंतर सर्व भाविक सुरक्षितपणे आपापल्या तळांवर परतले. बालटाल आणि नुनवान बेस कॅम्पमध्ये दररोज मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. प्रशासनाने नियोजित तारखेपूर्वी यात्रा करू नये, असे आवाहन करूनही अनेक भाविक मोठ्या संख्येने काश्मीरमध्ये पोहोचत आहेत. अमरनाथ यात्रा यंदाही अनंतनाग जिल्ह्यातील पारंपरिक ४८ किलोमीटर लांबीच्या पहलगाम मार्गाने तसेच गांदरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटर लांबीच्या बालटाल मार्गाने सुरू आहे.

भाविकांची विक्रमी गर्दी लक्षात घेता ९ जुलैपर्यंतचे सर्व नोंदणी स्लॉट पूर्ण भरले आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासनाने अद्याप नोंदणी न केलेल्या भाविकांना काही दिवस प्रवास पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. रविवारपासून केवळ नोंदणीकृत भाविकांनाच काश्मीरमध्ये प्रवेश दिला जात आहे. नव्या नोंदणीसाठी जागा उपलब्ध होईपर्यंत नोंदणी नसलेल्या भाविकांना तपासणी नाक्यांवरच थांबविण्यात येणार आहे.

देशभरातून हजारो भाविक जम्मूत दाखल होत असल्याने तेथील नोंदणी आणि टोकन वितरण केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तवी नदी परिसर, राम मंदिर, पुरानी मंडी आणि गीता भवन येथील नोंदणी केंद्रांवर सोमवारी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने विविध तारखांसाठी ५ हजार नोंदणी न केलेल्या भाविकांची नव्याने नोंदणी केली आहे.

यंदाची अमरनाथ यात्रा ५७ दिवस चालणार असून श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे. रामबन जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कमल जी जादू यांनी सांगितले की, यात्रेसाठी आरोग्य विभागाने सर्वतोपरी तयारी केली आहे. यात्रा मार्गावर विविध ठिकाणी १६ वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय चंदरकोट यात्री निवास आणि लांबर यात्रा कॅम्प ग्राउंड येथे अत्याधुनिक सुविधा असलेली दोन मिनी रुग्णालये उभारण्यात आली आहेत. प्रत्येक मिनी रुग्णालयात ४ खाटांची सुविधा, ईसीजी, हृदयविकार तपासणीची उपकरणे, अस्थमा रुग्णांसाठी नेब्युलायझर, कार्डियाक मॉनिटर यांसारख्या सुविधा उपलब्ध असून ही रुग्णालये २४ तास कार्यरत आहेत.

हे ही वाचा:

“भारतातून प्रचंड पाठिंबा” अमेरिकेलाच एकमेव मित्र मानण्यास नेतान्याहूंचा नकार

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सरासरीपेक्षा ११ टक्के अधिक पाऊस

पंतप्रधान मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना

धो-धो पावसाचा ‘वॉटर बोनस’! २४ तासांत मुंबईच्या पाणीसाठ्यात ३.७३% वाढ

यात्रेदरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुमारे ७५ जणांचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. यात २० डॉक्टर आणि ५० हून अधिक पॅरामेडिकल कर्मचारी सहभागी आहेत. प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version