तामिळनाडूतील होसूर येथे हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी पत्रके वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे. नारळ फोडणे, महिलांनी केसांत फुले माळणे, कापूर पेटवणे आणि धूप-सांबराणी जाळणे यांसारख्या प्रथांना चुकीचे किंवा निरर्थक ठरवणारी पत्रके वाटण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंबंधित माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषद (VHP)च्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून पोलिसांकडे धाव घेतली.
होसूर परिसरात ही पत्रके वितरित करण्यात आल्याचे वृत्त आहे. पत्रकांमध्ये मंदिरांमध्ये नारळ फोडणे, पूजेदरम्यान कापूर पेटवणे, सांबराणी जाळणे तसेच महिलांनी केसांत फुले घालणे या प्रथांवर आक्षेप घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रथा अनावश्यक, चुकीच्या किंवा निरर्थक असल्याचा संदेश पत्रकातून देण्यात आल्याचा दावा आहे. पत्रकात देवासंदर्भातही एक संदेश देण्यात आला असून, देव हा आपण वाहून नेतो असा नसून तोच आपला भार वाहतो, असा आशय त्यात असल्याचे वृत्त आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही महिला या पत्रकांचे वाटप करत धार्मिक प्रचारही करत होत्या. त्यांच्यासोबत काही मुलेही होती. संबंधित महिलांना त्या कोणत्या चर्च किंवा संस्थेशी संबंधित आहेत, याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी संबंधित चर्च किंवा संस्थेचे नाव अथवा तपशील स्पष्टपणे दिला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालता येणार नाही!
धोत्र्याच्या फळाची ऑनलाइन विक्री; ऍमेझॉनसह तीन कंपन्यांचे लायसन्स निलंबित
युपीआयची दशकपूर्ती; डिजिटल पेमेंट्समधील ऐतिहासिक ‘टर्निंग पॉइंट’!
पावसाची दुसरी इनिंग सुरू? उपग्रहातून दिसला ढगांचा प्रचंड पट्टा
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पत्रक वाटपाला आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांकडून पत्रके कोणी तयार केली, त्यांचे वाटप करणाऱ्या महिला कोण आहेत आणि त्यांचा कोणत्या संस्थेशी संबंध आहे का, याबाबत चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे.
