घरसंपादकीयकोठी क्रमांक ९६० पंजाबमध्ये ‘आप’चे लफडा सदन

कोठी क्रमांक ९६० पंजाबमध्ये ‘आप’चे लफडा सदन

पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यादरम्यान एका लफड्यावरून हाणामारी सुरू आहे. एक महिला या तंट्याचा केंद्रबिंदू आहे. सोनिया गांधी यांच्यावर भाजपा समर्थकांनी टीका केली. त्यांच्या पूर्वायुष्यावर चर्चा केली तर काँग्रेसवाल्यांना प्रचंड मिरच्या झोंबतात. ही टीका खरी की खोटी याबाबत फार काथ्याकूट न करता, एका महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा राग आळवण्याची सुरुवात होते. नारीशक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाबाबत बोलणारे, एका महिला नेत्याला अपमानित करत असल्याचा युक्तिवाद काँग्रेसवाले करत असतात. तेच काँग्रेसवाले आम आदमी पार्टीला नामोहरम करण्यासाठी एका लफड्याचा वापर करत आहेत. एका महिलेला चव्हाट्यावर लज्जित करताना दिसत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे लोक अक्षरश: एकमेकांचे कपडे उतरवताना दिसतायत. बहुधा सोनिया गांधी यांच्या व्यतिरिक्त इतर महिलांचे चारित्र्यहनन करायला त्यांची हरकत नसावी.

पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ नेते काँग्रेस आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी या प्रकरणात आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला आहे. चंदीगडमधील सरकारी बंगल्यांचा वापर भलत्याच कारणासाठी होतो आहे, असा त्यांचा दावा आहे. राजस्थानच्या आप नेत्या गायत्री बिश्नोई यांच्याबाबत खैरा यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. चंदीगड सेक्टर ३९ मध्ये मंत्र्यांसाठी राखीव असलेल्या सरकारी बंगल्याचे हे प्रकरण आहे. मनीष सिसोदिया यांच्याकडे पंजाब सरकारमध्ये कोणतेही पद नाही तरीही ते पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले डॉ. रवजोत सिंह यांच्या कोठी क्रमांक ९६० चा ताबा घेऊन तिथे राहतायत. राजस्थानच्या आप नेत्या गायत्री बिश्नोई या देखील त्याच बंगल्यात राहतायत. पंजाबमधील जनतेच्या कराचा पैसा आप नेत्यांच्या पाहुणचार आणि अय्याशीवर खर्च केला जात असल्याचा आरोप खैरा यांनी केला आहे. गायत्री बिश्नोई यांचा पंजाबशी काहीही संबंध नसताना देशात अनेक ठिकाणी फिरताना त्या पंजाब पोलिसांची सेक्युरीटी घेऊन फिरतात, असाही त्यांचा दावा आहे.

हे ही वाचा:

भाजपच्या नव्या टीमला मोठी जबाबदारी

भारत-म्यानमार सीमेवर आसाम रायफल्सचा जवान हुतात्मा

आता अग्निवीरांना राज्य सरकारी नोकरीत मिळणार स्थान

मनोज जरांगेंच्या विरोधात महिला सहकारी पोलिस ठाण्यात

या प्रकरणात नाव आल्यानंतर गायत्री बिश्नोई यांनी खैरा यांना जाहीरपणे शिव्या घातल्या आहेत. आपण कोठी क्रमांक ९६० मध्ये राहत नसून पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ. बलबीर सिंह यांच्या म्हणजे बाजूलाच असलेल्या कोठीमध्ये राहत असल्याचा खुलासा केला आहे. वडिलांना हृदयरोग असल्यामुळे उपचारादरम्यान मानवतेच्या नावाखाली त्यांना या कोठीत राहण्याची परवानगी मिळालेली आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. खैरा यांच्या विरोधात त्यांनी मानहानीची तक्रार नोंदवली असून त्यांना न्यायालयात खेचण्याची धमकी दिली आहे. एकूण दोघांच्या आरोपांवरून हे प्रकरण नेमके काय आहे, ते लक्षात येणे कठीण नाही. खैरा हे ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत. ते पंजाबचे विरोधी पक्षनेतेही होते. मधल्या काळात ते पक्ष सोडून आम आदमी पार्टीत दाखल झाले होते. २०२३ मध्ये एका जुन्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. याचा अर्थ आम आदमी पार्टीच्या नेत्यांना आणि तिथल्या संस्कृतीला ते चांगलेच ओळखून आहेत. शिवाय त्यांचा जुना खुन्नसही आहे. हा वाद इतक्या खालच्या पातळीवर आलेला आहे की, गायत्री बिश्नोई यांनी त्यांचे वडील हे हृदयरोगग्रस्त असल्याचे सांगितल्यानंतर खैरा यांनी त्यांचे छोले भटुरे खातानाचे फोटो सोशल मीडियावर टाकून उत्तर दिले. मंत्र्यांचीही सरबराई पंजाबमधील रुग्णांना का उपलब्ध होत नाही, असा सवाल केला. खैरा यांचा आपमध्ये असताना पंगा झाला होता ते निश्चित. आपमधून त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये उडी घेतल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश राहुल गांधी यांच्या उपस्थितीतच झाला आहे.

आता खैरा यांनी मनीष सिसोदिया यांच्या लंगोटीला हात घातला, त्यामुळे राज्य सरकार या वादात उतरणे स्वाभाविक होते. सिसोदिया हे केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू आहेत. पंजाबचे नामधारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या तुलनेत त्यांचे महत्त्व आणि वजन जास्तच आहे. पंजाबच्या राज्य महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले. या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

खैरा यांनी या मुद्द्याला पंजाबी विरुद्ध उपरे असा रंग दिला. ग्रेटर मोहाली एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये (ग्माडा) नोकऱ्या दिलेल्यांपैकी ९४ लोक बाहेरून आलेले आहेत. त्यांचा पंजाबशी संबंध नाही. पंजाबच्या करदात्यांचा पैसा आम आदमी पार्टीच्या लोकांच्या अय्याशीसाठी वापरला जातो आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी वापरला जातो आहे. मोहालीमध्ये असलेल्या पुडा भवनमध्ये केजरीवालांचे गेस्ट हाऊस सजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. इथे एक नवा शीशमहल उभारण्यात आला आहे. मोहालीत त्यांच्यासाठी हेलिपॅड बांधण्यात आले. ग्माडामध्ये अब्जावधींचा भ्रष्टाचार झालेला आहे. ईडीमार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे असेही खैरा यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी ज्या सरकारी तपास यंत्रणांवरून किंवा घटनात्मक संस्थांवरून सतत मोदी सरकारवर टीका करत असतात, त्याच संस्थांचे कौतुक राज्य स्तरावरील काँग्रेसचे नेते करत असतात. अन्यथा खैरा यांनी ग्माडाचा तपास ईडीमार्फत करण्याची सूचना करण्याचे कारण नव्हते. केरळचे काँग्रेस नेते रमेश चेन्निथला आणि मथ्यू कुझालनादन यांनी स्पेशल समरी रिव्हिजन या उपक्रमाचे कौतुक केले नसते. सोनिया गांधी यांच्या तारुण्यातील कथांबाबत चर्चा झाली तर काँग्रेस नेत्यांचा पारा चढतो. तेच काँग्रेसवाले एका महिलेवरून आम आदमी पार्टीच्या नेत्याचे वस्त्रहरण करताना दिसतायत. आता प्रश्न निर्माण होतो की, खैरा यांचे आरोप खरे आहेत की खोटे याबाबत चर्चा करायची, सिसोदिया यांच्या लफड्याबाबत चर्चा करायची की, महिलेच्या चारित्र्याचे चव्हाट्यावर धिंडवडे काढणे योग्य की अयोग्य याबाबत चर्चा करायची? काँग्रेसवाले एका महिलेच्या चारित्र्याबाबत चव्हाट्यावर चर्चा करत असतील तर हा अधिकार भाजपाला सुद्धा त्यांनी द्यायला हरकत नाही.

पंजाबच्या निवडणुकांमध्ये यंदा त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता आहे. कारण आम आदमी पार्टीबाबत जनतेचा मोहभंग झाला आहे. परंतु काँग्रेसमध्ये फार जोर असल्याचे दिसत नाही. त्यामुळे कोणालाच बहुमत मिळेल असे चित्र आज तरी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर होणारा लाठीमार असो, वा गायत्री बिश्नोई प्रकरण राहुल गांधी पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारच्या विरोधात तोंड उघडायला तयार नाहीत. त्यांनी मिठाची गुळणी घेतलेली दिसते. म्हणजे उद्या सत्तेसाठी एकत्र यायचे झाले तर अडचण नको असा हा हिशोब आहे.

हे काँग्रेसवाले आणि आम आदमी पार्टीचे नेते कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिंतोडे उडवण्याचे काम करतात. प्रत्यक्षात यांचे चारित्र्य किती बरबटलेले आहे ते पाहा. पंजाबमध्ये सरकार आहे, तिथल्या जनतेचे काही भले करण्याचे सोडून यांचीच मौजमजा सुरू आहे. पंजाबी तरुणाला रोजगार नाही, ड्रग्जचे थैमान चालले आहे. एका संपन्न राज्याची ओसाडवाडी करण्याचे काम आपचे सरकार करत आहे. दिल्लीतील जनतेने यांना शीशमहलमधून हुसकावल्यानंतर आता पंजाबमध्ये नवे शीशमहल आणि सोबत रंगमहाल उभारण्याचे काम सुरू आहे. राजकारणाची साफसफाई करायला आलेले, भ्रष्टाचार संपवायला आलेले लोक, भ्रष्टाचारात नखशिखांत माखले आहेत.

 

आपले तोंड काळे झाले आहे, म्हणून केजरीवाल यांनी त्यांचा पिट्टू अभिजित दिपके याला मैदानात उतरवले. त्याला पंजाबमधली धूळवड दिसत नाही, तो काँग्रेसशासित राज्यातही फिरकत नाही. तो फक्त भाजपशासित राज्यात शाळा शोधत फिरत असतो. याचे त्याचे राजीनामे मागत असतो. मुळात प्रश्न असा आहे, त्याचे राजकीय गोत्र असलेल्या आम आदमी पार्टीच्या नेत्यांबाबत त्याची वाचा का बसते? त्यांच्या लफड्यांकडे तो डोळेझाक का करतो, त्याचे कारण एकच आहे. यांचे चारित्र्यही केजरीवाल यांच्यासारखे आहे. खोटारडे आणि बेशरम. त्यामुळे आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांनी यातल्या एकाची जशी कॉलर पकडली, तसेच यांच्याशी वागले पाहिजे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version