घरसंपादकीयभूगोल कवचधारी हुतींनी अण्वस्त्रधारी पाकिस्तानला घाम फोडला

भूगोल कवचधारी हुतींनी अण्वस्त्रधारी पाकिस्तानला घाम फोडला

- Advertisement -

बलोच बंडखोर, टीटीपी, अफगाण तालिबानांनंतर पाकिस्तानचे उरली सुरली लाज काढण्याचे काम हुती बंडखोरांनी केलेले आहे. सतत अण्वस्त्रधारी देश असल्याच्या टीमक्या वाजवल्यामुळे पाकिस्तानच्या नेत्यांना सौदी सारखे देश जवळ करतात. हुती बंडखोरांसाठे छोटे कमकुवत गट मात्र पाकिस्तानी अण्वस्त्रांना भीक घालताना दिसत नाहीत. सौदी अरेबियाच्या बचावासाठी हस्तक्षेप केल्यास सणसणीत उत्तर देऊ असा जाहीर इशारा त्यांनी दिलेला आहे.

हुती बंडखोरांकडे इराणने पुरवलेली बॅलेस्टीक क्षेपणास्त्रे आहेत. सौदी अरेबियाच्या रियाध आणि यानबूपर्यंत ही क्षेपणास्त्रे धडकली आहेत. सौदीचे जबरदस्त नुकसान झालेले आहे. हुतींना चेचण्यासाठी पाकिस्तान काही हालचाल करेल अशी सौदीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात पाकिस्तानने काहीही हालचाल केली नाही, त्यामुळे सौदीचे राज्यकर्ते नाराज आहेत. ‘अशर्क अल अवसात’ आणि ‘अरब न्यूज’ आदी माध्यमांतून आता पाकिस्तान-तुर्कीयेचा समावेश असलेल्या मक्का कराराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाकिस्तानची मोठी गोची आहे. कारण हुतींना भिडणे याचा अर्थ इराणशी वाकडे घेणे. हुतींच्या पाठिशी इराण आहे, ही बाब जगजाहीर आहे. हुतींकडे असलेला शस्त्रसाठा इराणकडून आलेला आहे.

मक्का करार करताना सौदीची नजर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर होती. पाकिस्तानची नजर सौदीच्या तिजोरीवर होती. काही भीक मिळेल या आशेने पाकिस्तानने हा करार केला. या करारामुळे सौदीच्या पदरात मात्र काहीही पडले दिसत नाही. सौदीमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या सैन्याचे, लढाऊ विमानांचे  हुती बंडखोरांवर काडी मात्र दडपण दिसत नाही.

यमनमधील  अन्सार अल्लाहच्या राजकीय ब्यूरोचे सदस्य आणि धमार प्रांताचे राज्यपाल मोहम्मद अल-बुखैती यांनी इराकी वृत्त वाहिनीवरील ‘अनदर रीडिंग‘  या कार्यक्रमात पाकिस्तानला थेट धमकी दिली आहे. जर तुर्की आणि पाकिस्तान या संघर्षात उतरले, तर आम्ही त्यांना लोखंडी हाताने ठेचू.” सौदी अरेबियाच्या कथित आक्रमणात हे दोन्ही देश सहभागी झाल्यास त्यांना योग्य धडा शिकवला जाईल.

हे ही वाचा:

हमासचा अर्थविभाग प्रमुख मोहम्मद अबू अलवानला इस्रायलने टिपले

स्वदेशी एसीव्ही एच-५६२ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

पाचव्या स्थानावर राहिल्यामुळे मनू भाकरचे स्वप्न भंगले

अंकुश पंघलची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पाकिस्तानच्या तुलनेत हुतींची ताकद मुठभरही नाही. इराण- अमेरिकेच्या युद्धात भौगोलिक स्थान एखाद्या युद्धात किती महत्वाचे ठरू शकते हे स्पष्ट झालेले आहे. इराणच्या भौगोलिक स्थानामुळे होर्मुझवर ते नियंत्रण ठेवू शकतात. जगाची कोंडी करू शकतात. त्यांची लष्करी ताकद अमेरिकेच्या तोडीची नाही, ही बाब इथे दुय्यम ठरते. हुती सुद्धा इथेच वरचढ ठरतात. बाब अल मंदेब या सामुद्रधुनीवर हुतींचे वर्चस्व आहे. येमेन आणि आफ्रिका खंडातील जिबुती व इरिट्रीया या देशांच्या दरम्यान असलेली ही अत्यंत अरुंद सामुद्रधुनी आहे. उत्तर-पश्चिमेकडील लाल समुद्राला एडनचे आखात आणि अरबी समुद्राशी जोडणारा हा चिंचोळा सुमद्र पट्टा आहे.

हा सामुद्रधुनी हुतींच्या टप्प्यात आहे. हुती हे यमनमधील एक शिया-झैदीं समुदायाचे सशस्त्र लष्करी आणि राजकीय संघटन आहे. अधिकृतपणे त्यांना ‘अन्सार अल्लाह’  म्हणून ओळखले जाते. लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर आणि इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांमुळे हे गट सध्या जागतिक चर्चेत आहे.

१९९० च्या दशकात हुसेन बदरुद्दीन अल-हुती यांनी यमनच्या उत्तरेकडील सादा  प्रांतात ‘बिलिव्हिंग युथ’ नावाने या चळवळीची सुरुवात केली. यमनमधील सौदी अरेबियाचा वाढता प्रभाव रोखणे आणि अल्पसंख्याक झैदी शिया समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे, हा विचार घेऊन हे संघटन उभे राहीले. २००४ मध्ये यमन सरकार आणि हुती यांच्यात युद्ध सुरू झाले. यात हुसेन अल-हुती मारला गेला. त्याच्या नावावरूनच या गटाला ‘हुती’ म्हटले जाऊ लागले. सध्या त्याचा भाऊ अब्दुल-मलिक अल-हुती या गटाचे नेतृत्व करतो. २०१४ मध्ये हुतींनी यमनची राजधानी सना  वर ताबा मिळवला आणि यमनच्या अधिकृत सरकारला पळवून लावले. त्यानंतर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने हुतींविरुद्ध युद्ध पुकारले.

लाल समुद्र  आणि बाब-अल-मंदब या अत्यंत महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गावर हुतींचे नियंत्रण आहे. इराणच्या मदतीने विकसित केलेली किंवा इराण कडून मिळालेली लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि स्फोटक ड्रोन्स  त्यांच्याकडे आहेत. अमेरिकी हवाई दल यांचे काही वाकडे करू शकत नाही, कारण येमेनचा बराचसा प्रदेश हा डोंगराळ आहे. मरान, हझार, काहबूब, सरावत या पर्वतरांगामध्ये लढण्याचा हुतींना मोठा अनुभव आहे. सौदीच्या आधुनिक सैन्यालाही ते मात देऊ शकले आहेत. इस्रायल आणि अमेरिकेविरोधी भूमिकेमुळे यमनमधील अनेक स्थानिक नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळतो.

हुतींकडे स्वतंत्र आर्थिक संसाधने कमी आहेत. जगातील बहुतेक देश आणि संयुक्त राष्ट्र हुतींना यमनचे अधिकृत सरकार मानत नाहीत. त्यांच्याकडे स्वतःचे मजबूत हवाई दल किंवा आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा नाही. इराणसह इराक आणि सिरियातील शिया संघटनांचा पाठिंबा हुतींना मिळतो. परंतु भुगोल मात्र त्यांच्या पाठीशी आहे. अमेरिका जगातील सर्वात मोठी महासत्ता असली, तरी हुती बंडखोरांनी लाल समुद्रात अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक वर्चस्वाला मोठा तडाखा दिला आहे. अमेरिकेला थेट युद्धाने नामोहरम करण्याऐवजी हुतींनी अशा काही रणनीती वापरल्या आहेत ज्यामुळे अमेरिकेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठा ‘दणका’ बसला आहे.

हुती बंडखोर अमेरिकन युद्धनौका आणि व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यासाठी १०,००० ते २०,००० डॉलरचे अतिशय स्वस्त ड्रोन्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रे वापरतात. हे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला प्रति-क्षेपणास्त्र २ ते ४ दशलक्ष डॉलर खर्च करावे लागतात. स्वस्त शस्त्रांवर अमेरिकेला कोट्यवधी डॉलर्सची क्षेपणास्त्रे फुंकावी लागतात. ही हुतींची सर्वात मोठी रणनीती ठरली आहे. लाल समुद्र आणि ‘बाब-अल-मंदब’ सामुद्रधुनीतून जगातील १२% व्यापार होतो. होर्मुझमध्ये राडा सुरू असल्यामुळे बाब अल मंदेबला महत्व प्राप्त झाले आहे. इथे हुतींचा धिंगाणा सुरू आहे.

अमेरिकेने ब्रिटन आणि इतर मित्रदेशांना सोबत घेऊन २०२३ मध्ये हुतींविरोधात ‘ऑपरेशन प्रॉस्पॅरिटी गार्डियन’  सुरू केले आणि हुतींच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. हुतींचे या मोहिमेमुळे काहीही वाकडे झाले नाही. त्यांचे भुयारी नेटवर्क आणि गनिमी काव्यामुळे अमेरिकेचे हे हल्ले हुतींची ताकद पूर्णपणे नष्ट करू शकले नाहीत.

हुतींनी अमेरिकेचे अत्यंत आधुनिक मानले जाणारे कोट्यवधी डॉलर्सचे एमक्यू९ रिपर हे पाळत ठेवणारे ड्रोन्स क्षेपणास्त्रांनी पाडून अमेरिकेच्या लष्करी तंत्रज्ञानाला थेट आव्हान दिले. केवळ हवाई हल्ले करून हुतींचा नायनाट करता येत नाही. हुतींचे लढवय्ये यमनच्या डोंगराळ भागात आणि भुयारांमध्ये लपलेले आहेत. यमनमध्ये जमिनीवर सैन्य उतरण्याचा अमेरिका विचारही करू शकत नाही. कारण आधीच इराणने त्यांचे तोंड पोळले आहे.

लाल समुद्रातील जहाजांवर होणारे हल्ले थांबवणे हे अमेरिकेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा थेट फटका अमेरिकन आणि युरोपीय अर्थव्यवस्थेला बसत आहे. त्यामुळे ओमानमधील अमेरिकी दुतावासातील अधिकाऱ्यांनी हुती नेत्यांची भेट घेतली. आमच्या आणि इस्त्रालयच्या जहाजांवर हल्ले करू नका, तुमचा आणि आमचा काही झगडा नाही, असा निरोप दिला.

हुतींची लढाई सध्या फक्त सौदीच्या विरोधात आहे. काही प्रमाणात त्यांचा उपद्रव जेव्हा भारताला झाला तेव्हा आपण बॅक चॅनेल डीप्लोमसीचा वापर केला. यमन किंवा अदेनच्या आखातात भारतीय नागरिक आणि खलाशी संकटात सापडले किंवा ओलीस ठेवले गेले, तेव्हा भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी  आणि परराष्ट्र मंत्रालयाने स्थानिक मध्यस्थांमार्फत यशस्वी चर्चा करून त्यांची सुटका घडवून आणली आहे. ओमानची राजधानी मस्कत हे हुतींचे मुख्य राजकीय कार्यालय आणि आंतरराष्ट्रीय चर्चेचे केंद्र आहे. भारतीय राजनैतिक अधिकारी ओमानच्या सुरक्षायंत्रणांशी सतत संपर्कात असतात, ज्याद्वारे हुतींपर्यंत भारताचे संदेश पोहोचवले जातात. इराणही यासाठी उपयुक्त आहे.

२०१५ मध्ये जेव्हा सौदी अरेबियाने यमनमध्ये हस्तक्षेप केला होता, तेव्हा हुतींकडे केवळ ३०,००० च्या आसपास सैनिक होते. परंतु इस्रायल-हमास संघर्ष आणि लाल समुद्रातील तणावानंतर हुतींनी यमनमधील हजारो तरुणांची वेगाने भरती करून ही संख्या ३ लाखांच्या पार नेली आहे. हे मुठभर सैन्य देखील पाकिस्तानसारख्या अण्वस्त्रधारी देशाला दम देण्याचे सामर्थ्य ठेवते. यांच्या नादाला लागलो तर एका बाजूने इराण चेपेल दुसऱ्या बाजूने देशातील शिया उठाव करतील, या भीतीने गारठलेला पाकिस्तान गपगुमान बसला आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version