घरसंपादकीयराहुल गांधी काढणार मोदींचे टर्मिनेशन लेटर

राहुल गांधी काढणार मोदींचे टर्मिनेशन लेटर

 

कॉग्रेस नेते राहुल गांधी एक तर्क सातत्याने मांडताना दिसतायत. ‘मतचोरी झालेली आहे, त्यामुळे सत्तेवर बसलेले सरकार बेकायदा आहे. या सरकारने केलेले कायदे बेकायदा आहेत, सरकारच्या काळात झालेल्या सगळ्या नियुक्त्या बेकायदा आहेत.’ काँग्रेसने अजेंडा अजिबात लपवून ठेवलेला नाही. राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांची ताजी विधाने पाहिली की लक्षात येईल, असे पद्धतशीर एक चक्रव्यूह रचला जातो आहे. एकेक पाऊल पुढे टाकले जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याचा अजेंडा मागे पडला आहे. आता काँग्रेसने नवा अजेंडा रेटायला सुरुवात केली आहे. हाच काँग्रेसचा मूळ अजेंडा आहे.

९ ऑक्टोबर रोजी जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली. यात समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यासह बाकी घटकपक्षांचे नेते जमले होते. त्या बैठकीत राहुल गांधी यांनी केलेले भाषण, दहशतवाद्यांचे वकील कपिल सिब्बल यांचे ताजे विधान, टेस्ला, स्टारलिंकचा मालक एलॉन मस्क याने भारत सरकारच्या विरोधात उघडलेली आघाडी, रॉयटर्स, अल-जझीरा, द गार्डियन आदी तमाम विदेशी वर्तमानपत्रांत कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतर -२ आंदोलनात मिळालेली प्रसिद्धी याचा विचार केल्यास लक्षात येते की संपूर्ण इकोसिस्टीम कामाला लागलेली आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या मुखातून मनातले बाहेर पडले. ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जाऊन समस्या संपणार नाही. खरी समस्या त्यापेक्षा मोठी आहे. ती समस्या आहे मोदी सरकार. त्यामुळे मोदी सरकारला घालवले पाहिजे, त्यानंतर अनेक वर्षे आपल्याला लोकशाही व्यवस्थेचे जे नुकसान झाले आहे, त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. आणि हा असा विषय आहे, ज्यासाठी लढावे लागेल, मरावे लागेल.’

‘टर्मिनेशन ऑफ मोदी गव्हर्नमेंट’ हा शब्द राहुल गांधी यांनी वापरला आहे. मोदी सरकारचे राहुल गांधी यांनी टर्मिनेशन लेटर काढले आणि मोदी संपले असे होणार नाही. इथे राहुल गांधी सुचवतायत की ते आता टर्मिनेटर होणार आहेत. निवडणुकीत भाजपाचा पराभव करून ते जाणार नाहीत. कारण निवडणुका पारदर्शी होत नाहीत, मतचोरी होते आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या दृष्टीने निवडणुका हा मार्ग उपलब्धच नाही. आंदोलनाच्या माध्यमातून अराजक माजवावे तर सर्वोच्च न्यायालय आडवे येते, म्हणून सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा प्रहार करणे काँग्रेससाठी गरजेचे होते, कपिल सिब्बल यांनी ते सुरू केलेले आहे. अराजकाचे राजकारण हा टर्मिनेटरचा गेम प्लान आहे.

‘पुन्हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावून आता थकलो आहे, त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. माझा तर विश्वास उठला आहे.’ हे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचे ताजे विधान आहे. ‘देशातील जनतेला हे सरकार नको आहे. देशात घटना वाचवण्याचे काम कोणी करू शकेल तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय आहे. मतदार यादीतून कापलेल्या नावांबाबत आम्ही कित्येक महिने युक्तिवाद केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे न्यायालयावर आता विश्वास उरलेला नाही’, असे त्यांचे म्हणणे आहे. देशाच्या जनतेचा न्यायालयावर विश्वास नाही, हे जनतेने त्यांच्या कानात येऊन सांगितले का? कोणाचे सरकार हवे हे जनता निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट करत असते. त्यांचे कपिल सिब्बल यांच्यासारखे नाही. कधी हे मतदार याद्यांच्या सफाईची मागणी करत होते. आता ते एसआयआर विरोधात बोलतायत.

हे ही वाचा:

उदयवीर सिद्धूची सुवर्णकामगिरी

मणिपूरातील ताज्या हिंसाचारात ९ लोकांचा मृत्यू

नेपाळमध्ये पुन्हा पुराचे संकट

भारतातील गुंतवणुकीत जपानची आघाडी

सिब्बल सर्वोच्च न्यायालयाबाबत निराश आहेत. त्यांच्या निराशेचे कारण जाणून घ्या. कपिल सिब्बल आतापर्यंत कशाकशासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आठवा, खलिस्तानी दहशतवादी देवेंद्र सिंह भुल्लर, १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट कटातील आरोपी याकूब मेमन, उमर खालिद, नॅशनल कॉन्फरन्सचा फुटीरवादी नेता मोहम्मद अकबर लोन, अनेक घातपातांच्या कटात सामील असलेला केरळचा जिहादी मौलाना अब्दुल नासेर मदनी, बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा सिद्दीक कप्पान. रामजन्मभूमीच्या विरोधात यांनी सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू लढवली. मनी लाँडरिंगशी संबंधित कठोर कायदे, सीएए, कलम ३७०, एसआयआर, यासाठी सिब्बल लढले. म्हणजे यांचा लढा हिंदूंच्या विरोधात दहशतवाद्यांसाठी, जिहादींसाठी आणि अनेकदा देशद्रोह्यांसाठी होता. त्यात त्यांना यश आले नाही, म्हणून आता सर्वोच्च न्यायालयावर त्यांचा विश्वास उरलेला नाही.

मतचोरीबाबत राहुल गांधी जो उफराटा प्रचार करतायत, निवडणूक प्रक्रियेबाबत लोकांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण करतायत त्याचे कारण समजून घेण्याची गरज आहे. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सलग दोन वेळा सरकार आले. भाजपा आणि काँग्रेसच्या मतांमध्ये अनुक्रमे ४.३७ आणि ९.७५ टक्के मतांचा फरक होता. भाजपाला जिंकण्यासाठी हा फरक संपवण्याची गरज होती. त्यासाठी मतदानाचा पॅटर्न बदलण्याची गरज होती. २०१४ मध्ये भाजपाने हे घडवून दाखवले. २००४ आणि २००९ मध्ये मतदानाचा टक्का अनुक्रमे ५८.०७ आणि ५८.१९ होता. २०१४ मध्ये हा टक्का भाजपाने प्रयत्नपूर्वक आठ टक्क्यांनी वाढवला. एकूण मतदान ६६.४४ झाले. २०१९ मध्ये यात आणखी भर पडली, एकूण मतदान ६७.४० टक्के झाले. वाढलेले मतदान हिंदूंचे होते. त्यामुळे त्याचा फायदा भाजपाला झाला. २०१४ नंतर हिंदू मतदार अधिकाधिक भाजपाच्या बाजूने कलायला लागला. आता तर परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचे तारू केवळ मुस्लिम मतांवर टिकलेले आहे. मुस्लिम मते सुद्धा मिळतीलच अशी परिस्थिती नाही.

निवडणुकीच्या राजकारणात हिंदू मतांचा वाढलेला प्रभाव राहुल गांधी यांना खटकतो आहे. हा प्रभाव कायम राहणार याची त्यांना खात्री आहे. २०२९ मध्येही सत्ता मिळणे शक्य नाही, यावर त्यांचा विश्वास बसलेला आहे, त्यामुळे त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर शरसंधान सुरू केले आहे. त्यांना सत्तेवर कोण असेल किंवा नसेल याचा फैसला रस्त्यावर अराजक माजवून करायचा आहे. या देशात निवडणुकीच्या निकालावर जो हिंदू मतांचा प्रभाव निर्माण झाला आहे, तो मोडीत काढायचा आहे. कारण त्यांना ठाऊक आहे, हिंदूंनी पाठ फिरवल्यामुळे यापुढे जिंकता येणार नाही. मुस्लिम मतांची आता शाश्वती उरलेली नाही.

राहुल गांधी आणि सिब्बल यांचा रोख स्पष्ट आहे. राहुल गांधी म्हणतायत निवडणूक प्रक्रिया पारदर्शी नाही, मुख्य निवडणूक आयुक्तांवर त्यांचा विश्वास नाही, कपिल सिब्बल म्हणाले, सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही. मग टर्मिनेशन ऑफ मोदी गव्हर्नमेंटसाठी मार्ग कोणता उरतो. तो मार्ग आहे, रस्त्यावर उतरा. जो कोणी मोदींच्या विरोधात बोलेल त्याला आपलेसे करा. एलॉन मस्क याच्या गळ्यात गळे घालण्याचे काम त्यासाठीच सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सची मालकी मस्ककडे आहे. भरपूर पैसा आहे. इराण युद्ध, युक्रेन-रशियाच्या युद्धात स्टारलिंकची भूमिका अमेरिकेने एखाद्या शस्त्रासारखी केली. त्यामुळे स्टारलिंक इंटरनेट सेवेला दारे खुली करण्याबाबत जगातील अनेक देश फेरविचार करीत आहेत. चीन, रशियासारख्या देशांनी तर दारेच बंद केली आहेत. भारतही त्याच मार्गावर असल्यामुळे मस्क सध्या भैसाटले आहेत. जगातील सर्वोच्च आयक्यू असलेला एक उद्योजक जगातील न्यूनतम आयक्यू असलेल्या एका राजकारण्याच्या गळ्यात गळे घालतो आहे, असे चित्र जगाला दिसते आहे.

स्टारलिंकला भारतात प्रवेश मिळत नसल्यामुळे एलॉन मस्कने मोदी सरकारच्या विरोधात एक्सवर पोस्टचा भडीमार सुरू केला आहे. आधी तो मुकेश अंबानी यांना ऑलिगार्च म्हणाला. नंतर रिअल बॉस ऑफ इंडिया म्हणाला, प्राईम मिनिस्टर अंबानी म्हणाला.

यावर राहुल गांधी खूष होतात आणि एलॉन मस्कला म्हणतात, वेलकम टू इंडिया एलॉन. जेव्हा एलॉन मस्कने भारतात स्टारलिंकचा प्रस्ताव दिला होता, ‘मी मोदींचा फॅन आहे’, असे जाहीर वक्तव्य केले होते, तेव्हा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी स्टारलिंकच्या इंटरनेटचा भारताला कसा धोका आहे, याबाबत सविस्तर विवरण केले होते. जयराम रमेश यांनी धोकादायक ठरवलेल्या स्टारलिंकच्या मालकाच्या गळ्यात गळे राहुल गांधी का करतायत?

राहुल गांधी, सिब्बल, दिपके, मस्क हे समीकरण देशाच्या मुळावर उठलेले आहे. यांना ठोकूनच सरळ करता येईल. मोदी सरकार त्याच वाटेवर आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version