घरदेश दुनियारशिया-युक्रेन युद्धविरामासाठी भारताचा त्रिपक्षीय प्रस्ताव

रशिया-युक्रेन युद्धविरामासाठी भारताचा त्रिपक्षीय प्रस्ताव

ऊर्जा, काळ्या समुद्रातील सुरक्षा याचा समावेश

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला पाच वर्षे होत असताना भारताने युद्धविरामासाठी त्रिपक्षीय व्यापक प्रस्ताव पुढे केला आहे. ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवणे, काळ्या समुद्रामार्गे धान्य आणि ऊर्जेचा पुरवठा सुरू ठेवणे तसेच व्यापारी जहाजांवरील हल्ले रोखणे, या तीन प्रमुख मुद्द्यांचा भारताच्या प्रस्तावात समावेश आहे. युक्रेनने भारताचा हा प्रस्ताव चार आंतरराष्ट्रीय प्रस्तावांपैकी सर्वाधिक व्यापक असल्याचे म्हटले आहे.

भारताने हा प्रस्ताव परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सप्टेंबरमधील कीव्ह दौऱ्यादरम्यान युक्रेनसमोर मांडला होता. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रिय सिबिहा यांनी भारताकडून युद्धविरामाचा प्रस्ताव मिळाल्याची पुष्टी केली आहे. तुर्की, इजिप्त आणि अमेरिकेकडूनही युक्रेनला युद्धविरामासाठी प्रस्ताव मिळाले आहेत. मात्र, सिबिहा यांनी भारताचा प्रस्ताव या सर्वांमध्ये सर्वाधिक व्यापक असल्याचे म्हटले आहे.

भारताच्या प्रस्तावात नेमके काय?

भारताच्या तीन मुद्द्यांच्या प्रस्तावाचा पहिला भाग ऊर्जा आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवण्याशी संबंधित आहे. युद्धादरम्यान ऊर्जा केंद्रे आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात असल्याने त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होत आहे. त्यामुळे अशा ठिकाणांवरील हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव भारताने दिला आहे.

दुसरा मुद्दा काळ्या समुद्रामार्गे धान्य आणि ऊर्जेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसाठी काळा समुद्र हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरील संघर्षामुळे धान्य आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून महत्त्वाच्या वस्तूंची वाहतूक सुरू राहावी, अशी भारताची भूमिका आहे.

तिसरा मुद्दा काळ्या समुद्रामध्ये व्यापारी जहाजांवरील हल्ले थांबवण्याचा आहे. व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न भारतासाठी विशेष महत्त्वाचा आहे. या संघर्षात भारतीय खलाशांचा जीव धोक्यात आला असून, व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमुळे वाहतूक आणि ऊर्जा पुरवठ्याचा खर्चही वाढत आहे.

हे ही वाचा:

देशासमोर सत्ता, पद, प्रतिष्ठा काहीही मोठे नाही!

“हे होईल, आम्ही करून दाखवू” पंतप्रधान मोदींचा देशाला नवा मंत्र

सोलापुरात डिटर्जंटयुक्त दूध, नवी मुंबईत रसायनमिश्रित केळी जप्त

“इस्लामकडून फ्रान्स काबीज करण्याचा प्रयत्न”; ट्रम्प यांचा स्थलांतराकडे इशारा

अमेरिका, तुर्की आणि इजिप्तच्या प्रस्तावांपेक्षा वेगळा

भारताचा प्रस्ताव इतर देशांच्या प्रस्तावांपेक्षा अधिक व्यापक असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तुर्की आणि इजिप्तचे प्रस्ताव प्रामुख्याने काळ्या समुद्रामार्गे धान्याची वाहतूक सुरळीत ठेवण्यावर आणि व्यापारी जहाजांवरील हल्ले थांबवण्यावर केंद्रित आहेत. अमेरिकेच्या प्रस्तावाचा भर ऊर्जा क्षेत्रातील हल्ले थांबवण्यावर आहे. भारताने मात्र ऊर्जा पायाभूत सुविधा, धान्य आणि ऊर्जा पुरवठा तसेच व्यापारी जहाजांची सुरक्षा या तिन्ही बाबी एकाच प्रस्तावात मांडल्या आहेत.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मोदींकडे संघर्षावर परस्परांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी चांगल्या कल्पना असल्याचे पुतिन यांनी म्हटले. मोदी तटस्थ भूमिका कायम ठेवत असूनही युद्ध समाप्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version