घरदेश दुनियाव्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन अमिस्ताद’

व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन अमिस्ताद’

वैद्यकीय पथक, ३५ टन मदतसाहित्य आणि ‘भीष्म क्यूब रवाना

उत्तर व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने मानवतावादी मदतीसाठी पुढाकार घेत ‘ऑपरेशन अमिस्ताद’ सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराचे विशेष वैद्यकीय पथक, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि मोठ्या प्रमाणात मदतसाहित्य भूकंपग्रस्त भागात पाठविण्यात आले आहे. या उपक्रमातून संकटाच्या काळात मित्रदेशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भारताची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.

भारतीय लष्कराच्या ६० पॅरा फील्ड हॉस्पिटलमधील ४१ सदस्यीय विशेष वैद्यकीय पथक भारतीय हवाई दलाच्या दोन सी-१७ ग्लोबमास्टर विमानांद्वारे व्हेनेझुएलाकडे रवाना झाले आहे. या पथकात नऊ अनुभवी लष्करी डॉक्टरांसह परिचारक आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असून ते भूकंपग्रस्त भागात आपत्कालीन आरोग्यसेवा, गंभीर जखमींवर उपचार, ट्रॉमा व्यवस्थापन, शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेसाठी सहा टनांहून अधिक वैद्यकीय साहित्य आणि मानवतावादी मदत सामग्री पाठविण्यात आली आहे. याशिवाय भारताच्या ‘आरोग्य मैत्री’ उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले अत्याधुनिक ‘भीष्म क्यूब’ देखील या मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहेत. हे मॉड्युलर स्वरूपातील फील्ड हॉस्पिटल अल्पावधीत उभारता येते आणि आपत्तीग्रस्त भागात तातडीने ट्रॉमा केअर, आपत्कालीन शस्त्रक्रिया तसेच अतिदक्षता उपचार उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर ‘ऑपरेशन अमिस्ताद’ची माहिती देताना सांगितले की, भारतीय हवाई दलाची दोन सी-१७ विमाने भूकंपग्रस्त व्हेनेझुएलासाठी मदत आणि बचाव साहित्य घेऊन रवाना झाली आहेत. या मदतीमध्ये भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटल युनिटसह पस्तीस टनांहून अधिक मदतसाहित्य, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि दोन भीष्म क्यूब पाठविण्यात आले आहेत. या कठीण काळात भारत व्हेनेझुएलाच्या सरकार आणि जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भीष्म क्यूब हे या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान मानले जात आहे. ही प्रणाली अत्यल्प वेळेत कार्यान्वित होऊन सुमारे दोनशे रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता ठेवते. त्यामध्ये जीवनरक्षक सुविधा, ट्रॉमा केअर, आपत्कालीन शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता उपचारांची संपूर्ण व्यवस्था उपलब्ध असून नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागात जलदगतीने वैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

ऑपरेशन सिंदूरमधील सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर

राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणानंतर चंपत राय यांचा राजीनामा

सिया दोषी असेल तर मृत्युदंडाची शिक्षा द्या!

स्टेट बँक घोटाळाप्रकरणी श्रीकांत भसींच्या विमा पॉलिसी जप्त

भारताचा हा उपक्रम केवळ मदतसाहित्य पाठविण्यापुरता मर्यादित नसून, संकटाच्या काळात मित्र राष्ट्रांना सर्वतोपरी मदत करण्याच्या भारताच्या धोरणाचा तो महत्त्वाचा भाग मानला जात आहे. व्हेनेझुएलाच्या जनतेप्रती एकजूट व्यक्त करत भारताने पुन्हा एकदा जागतिक मानवतावादी जबाबदारी पार पाडण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version