घरसंपादकीयब्राझीललाही गवसला वोट चोरीचे तुणतुणे वाजवणारा राहुल गांधी

ब्राझीललाही गवसला वोट चोरीचे तुणतुणे वाजवणारा राहुल गांधी

ब्राझीलमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लुईझ इनासियो लुला द सिल्व्हा चौथ्यांदा विजयी झाले. निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे समर्थक असलेल्या फ्लॅव्हीओ बोल्सोनारो यांचा त्यांनी पराभव केला. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर ट्रम्प यांनी व्यक्त होण्याचे काहीच कारण नव्हते. ब्राझीलच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्याच्या खोडीमुळे त्यांनी ब्राझीलमध्ये वोटचोरी झाल्याचे तुणतुणे वाजवले. निवडणुकीत घपला झाल्याचा आरोप केला. वोटचोरी हे जगभरातील पराभूतांचे पालूपद बनले आहे. योगायोग म्हणजे लुला यांनी पराभूत केलेले फ्लॅव्हीओ हे देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे रडतराऊ युवराज आहेत. राहुल आणि त्यांच्यात बरीच साम्य स्थळे आहेत.

 

एका सार्वभौम देशाने दुसऱ्या सार्वभौम देशाच्या कामकाजात, व्यवहारात, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, हा राजकीय शिष्टाचार आहे. दुर्दैवाने जगाच्या इतिहासात अशी उदाहरणे विरळा आहेत. जगात शिष्टाचारापेक्षा जंगलाचा कायदा जास्त चालतो. इथे कायदे आणि नियम फक्त शक्तिहीनांसाठी असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तर एखाद्या मोकाट वळूप्रमाणे जागतिक शिष्टाचार पायदळी तुडवत चालले आहेत. त्यांनी ताजी ढवळाढवळ ब्राझीलच्या अंतर्गत बाबींमध्ये केलेली आहे. त्यांना धार्जिण्या असलेल्या ब्राझीलच्या राजकीय नेत्याच्या आरोपांना साथ देण्याचे काम केले आहे. राष्ट्राध्यक्ष लुला यांना निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ट्रम्प यांच्या टोळभैरव राजकारणाच्या विरोधात जगभरातील जे प्रमुख नेते उभे राहिले, त्यात लुला यांचा समावेश आहे. ते डाव्या विचारसरणीचे जरी असले तरी घनघोर राष्ट्रवादी आहेत. विजयी झाल्यानंतर ट्रम्प यांच्या टीकेकडे साफ दुर्लक्ष करत ब्राझीलला जगातील कोणत्याही महाशक्तीचे बॅकयार्ड बनू देणार नाही, असे विधान त्यांनी केले आहे. या विधानाचा रोख ट्रम्प आणि अमेरिकेकडेच होता.

 

फ्लॅव्हीओ बोल्सोनारो हे माजी राष्ट्राध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांचे सुपुत्र आहेत. अर्थात ते घराणेशाहीचे दुकान चालवतायत. बोल्सोनारो पिता-पुत्र हे ट्रम्प समर्थक आहेत. पराभवानंतर फ्लॅविओ यांनी ही निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचे सांगत निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आलेली डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया मुख्यत्वे फ्लॅविओ बोल्सोनारो यांच्या याच दाव्यांना राजकीय बळ आणि समर्थन देण्यासाठी होती. ब्राझीलमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. एकूणच तिथले राजकारण पाहून भारतात जे काही घडते आहे, तेच तिथे घडताना दिसते आहे.

हे ही वाचा:

थंड बसलात तर तुमचे नेतृत्व करणार नाही!

‘अर्णब’ चक्रीवादळाचा आंध्र प्रदेश-ओडिशाला तडाखा

आई-वडिलांशी वादानंतर नवव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न

वैभवचा ‘भाग मिल्खा भाग’ अंदाज!

राहुल गांधी यांनी भारतात जे काही केले तेच फ्लॅव्हीओ यांचे खानदान तिथे करते आहे. ईव्हीएम मशीनवर संशय घेणे, निवडणुकीत घपला झाल्याचा आरोप करणे, निवडणूक आयोगावर आक्षेप घेणे, घटनात्मक संस्थांना बदनाम करणे या सगळ्या बाबतीत राहुल यांना झाकावे आणि फ्लॅव्हीओ यांना काढावे इतके साम्य आहे. राहुल यांच्या मागे जनता नाही. फ्लॅव्हीओ यांनाही जनतेचा पाठिंबा नाही. राहुल यांच्या प्रमाणेच त्यांनाही विदेशी शक्तींची साथ आहे. आता ते राहुल गांधी यांच्याप्रमाणे वारंवार थायलंड, मलेशियाचे दौरे करतात का, हे उघड झालेले नाही; परंतु तिथली लिबर्टी पार्टी आणि भारतातील काँग्रेस पक्ष यांचे राजकारण आश्चर्यकारक रित्या सारखे आणि देशबुडवे आहे. फ्लॅव्हीओ आणि राहुल गांधी हे दोन्ही नेते आपल्या राजकीय बचावासाठी आणि हल्ल्यांसाठी सोशल मीडियाचा वापर अत्यंत प्रभावीपणे करताना दिसतात. आपले विचार थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर खूप सक्रिय असतात.

 

फ्लॅव्हीओ हे देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे राजकारणाचे खानदानी दुकान चालवतायत. २०२२ च्या निवडणुकीत फ्लॅव्हीओ यांचे वडील जाईर बोल्सोनारो यांचा पराभव झाला होता. तेव्हा ते राष्ट्राध्यक्ष होते. लुला यांच्या विरोधात ते पराभूत झाले. ही निवडणूक अटीतटीची झाली होती. तेव्हाही ट्रम्प यांनी अशीच विधाने केली होती. कारण जाईर बोल्सोनारो यांचा पक्ष ट्रम्प यांच्याप्रमाणे उजव्या विचारसरणीचा समर्थक आहे. जाईर हे ब्राझीलचे ट्रम्प म्हणून ओळखले जातात.

 

ब्राझीलच्या निवडणूक कायद्यानुसार, पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला ५०% पेक्षा जास्त मते न मिळाल्यास पहिल्या दोन उमेदवारांमध्ये ‘दुसरी फेरी’ होते. अशी दुसरी फेरी झाली, त्यात लुला यांनी अगदी निसटत्या मताधिक्याने विजय मिळवला. अंतिम निकाल येईपर्यंत संपूर्ण देशात प्रचंड राजकीय तणाव आणि धाकधूक होती.

 

अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर जाईर बोल्सोनारो यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी निवडणूक निकाल फेटाळला. त्यांच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने सुरू केली. ट्रम्प समर्थकांनी जो तमाशा ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेत केला होता, तसाच प्रकार ब्राझीलमध्ये घडला होता. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर धडक दिली होती. ब्राझीलमध्ये ८ जानेवारी २०२३ रोजी लुला यांचा शपथविधी झाला. त्यानंतर काही दिवसांनी जाईर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी ब्राझीलची संसद अर्थात नॅशनल काँग्रेस, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवनावर धडक दिली. हिंसक हल्ले केले. सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ आणि मोडतोड केली. लष्कराने बंड करून सत्ता हाती घ्यावी, अशी मागणी केली.

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणणारे आणि हिंसाचार भडकवणारे जाईर बोल्सोनारो समर्थक यांच्यावर न्यायालयाने आणि प्रशासनाने कायदेशीर बडगा उगारला. माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यावर भविष्यात निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळेच यंदाची निवडणूक फ्लॅव्हीओ यांनी लढवली. हरल्यानंतर आता ते वडिलांच्या मार्गाने जाण्याच्या तयारीत आहेत.

ब्राझीलमध्ये फ्लॅव्हीओ आणि त्यांच्या कुटुंबाचा सर्वोच्च निवडणूक प्राधिकरण (TSE) आणि न्यायव्यवस्था यांच्याशी तीव्र संघर्ष झाला आहे. राहुल गांधी यांनी जसा निवडणूक आयोगासोबत उभा दावा मांडलाय, अगदी तसाच. निवडणुकीच्या निकालांवर आणि न्यायालयाच्या निर्णयांवर त्यांनी वारंवार शंका घेतली आहे. ब्राझीलच्या न्यायालयाने बोल्सोनारो गटाचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध केले.

बोल्सोनारो यांनीही निवडणूक होण्यापूर्वीच ब्राझीलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेवर वारंवार शंका उपस्थित केल्या होत्या. जर आपण हरलो, तर ती ‘चोरी’ असेल असा आधीच संदेश त्यांच्या समर्थकांमध्ये पसरवला गेला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर फ्लॅव्हीयो यांनी पुन्हा वडिलांप्रमाणे टुमणे लावले आहे.

फ्लॅविओ बोल्सोनारो यांचा पक्ष लिबर्टी पार्टी आणि सर्वोच्च निवडणूक प्राधिकरणाने मात्र लुला यांचा विजय स्वीकारला आहे. इतके झाल्यानंतर खरे तर ट्रम्प यांना तोंड घालण्याचे काही कारण नव्हते, परंतू त्यांनी ते घातलेच. निवडणुकीत घपला झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मतमोजणीची मुदत वाढवणे संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले आहे. असे दावे करणारे कधीच पुरावे देत नाहीत. ट्रम्प यांनी पुराव्यांबाबत मौन बाळगले आहे. “मी ब्राझीलच्या निवडणुकीत उभा नाही, मी अमेरिकेसाठी काम करतो आहे. माझे वैयक्तिकरीत्या लुला यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि ते मला आवडतात,” अशी पुस्ती जोडून ते मोकळे झाले.

 

भारतात काँग्रेससारखा घराणेशाहीचे राजकारण करणारा, पूर्णपणे देशविरोधी आणि डाव्या विचारसरणीकडे झुकलेला पक्ष, आणि लिबर्टी पार्टी हा पूर्णपणे उजव्या विचारसरणीकडे झुकलेला पक्ष या दोन्ही पक्षांतील ठसठशीत फरक असला तरी दोघांचे कारनामे सारखेच आहेत. दोघांनी सत्तेचा स्वाद चाखला आहे. परंतु एकदा हातून निसटलेली सत्ता पुन्हा हाती येत नाही, म्हणून दोघेही अस्वस्थ आहेत. चरफडतायत. जनतेचा कौल स्वीकारायचे सोडून वोटचोरीचे तुणतुणे वाजवतायत. देशात असा अपरिपक्व आणि देशाच्या हिताची किंचितही चिंता नसलेला नेता निपजतो, तेव्हा बाहेरील शक्ती त्याचा फायदा उठवण्यासाठी तयार असतातच. ब्राझीलमध्ये त्याची झलक मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी देशाला त्याच दिशेने नेण्याचा प्रयत्न करतायत.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version