नेपाळमध्ये हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या भीषण महापुराने मोठी विध्वंसक परिस्थिती निर्माण केली आहे. भोटे कोशी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २,५०० नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये ३०० हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली आहे. दुर्घटनेनंतर आज चौथा दिवस असून, बाधित भागात बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अत्यंत दुर्गम आणि खडतर भौगोलिक परिस्थितीमुळे बचाव पथकांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत.
हिमनदी कोसळल्यानंतर बर्फ, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोट भोटे कोशी नदीच्या पात्रातून वेगाने खाली आला. या महापुराने अनेक गावे आणि शहरे अक्षरशः उद्ध्वस्त केली. घरांसह वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले, तर काही महत्त्वाच्या प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे. रसुवा परिसरासह तीन जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नेपाळ पोलीस आणि सुरक्षा दलांकडून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या आपत्तीचा परिणाम नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागातही झाला आहे.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये ‘आप’ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; फिरोजपूरमध्ये खळबळ
कर्मभूमीशी निष्ठा, जन्मभूमीशी नातं!; मोहन भागवतांचा परदेशातील भारतीयांना संदेश
तरुणांच्या प्रश्नांवर भाजपचा फोकस; नितीन नबीन यांची ‘टीम-४५’सोबत चर्चा
एचडीएफसी बँकेला मोठा धक्का; सीईओ शशीधर जगदीशन पदावरून पायउतार होणार
दरम्यान, बेपत्ता भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी भारतीय दूतावासाने २४ तास कार्यरत हेल्पलाइन सुरू केली आहे. काठमांडू येथील भारतीय दूतावासाशी +९७७ ९८५ १३१ ६८०७ आणि +९७७ ९७० ९१० ७५०० या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. तसेच बीजिंगमधील भारतीय दूतावासाचा व्हॉट्सॲप क्रमांकही मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
भारतीय दूतावास नेपाळच्या प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, पुरात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, उपलब्ध ताज्या माहितीनुसार काही भारतीय नागरिकांची सुटका झाली असून काहींशी पुन्हा संपर्कही प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे बचावकार्य पुढे सरकत असले तरी मोठ्या संख्येने नागरिक अद्याप बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता कायम आहे.
