घरबिजनेसएनएसईमध्ये एलआयसीची घसघशीत गुंतवणूक

एनएसईमध्ये एलआयसीची घसघशीत गुंतवणूक

२२,५६९ कोटींच्या इश्यूला मोठा प्रतिसाद

- Advertisement -

देशातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतीक्षित आयपीओपैकी एक असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसईच्या आयपीओला आज, १७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. तब्बल २२,५६९ कोटी रुपयांच्या या आयपीओमुळे भारतीय भांडवली बाजाराचे लक्ष एनएसईकडे लागले आहे. हा आयपीओ २१ सप्टेंबरपर्यंत खुला राहणार असून, शेअर्सचे २४ सप्टेंबर रोजी सूचीबद्धीकरण होण्याची अपेक्षा आहे. आयपीओसाठी प्रति शेअर १,७०० ते १,७८५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये ८ शेअर्स असून, कमाल किंमत पट्ट्यानुसार किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,२८० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण आयपीओ ‘ऑफर फॉर सेल’ म्हणजेच ओएफएस स्वरूपाचा आहे. त्यामुळे आयपीओमधून मिळणारी रक्कम थेट एनएसईकडे जाणार नसून विद्यमान भागधारकांना मिळणार आहे.

आयपीओ खुला होण्यापूर्वीच एनएसईला संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. १६ सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून एनएसईने तब्बल ६,७४६ कोटी रुपयांची उभारणी केली. या अँकर बुकमध्ये १८९ गुंतवणूकदार सहभागी झाले असून, परदेशी गुंतवणूकदारांचाही मोठा सहभाग आहे. या वाटपातील सुमारे ४३ टक्के शेअर्स परदेशी गुंतवणूकदारांना देण्यात आले आहेत. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसीसह मॉर्गन स्टॅन्ले आणि गोल्डमन सॅक्स यांसारख्या मोठ्या संस्थांनीही एनएसईच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. एलआयसीने सुमारे ४६५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांकडून मिळालेला हा मोठा प्रतिसाद एनएसईच्या आयपीओबाबत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा रस स्पष्ट करतो.
हे ही वाचा:
अतिककडून जप्त केलेल्या जमिनीवरील घरात मोदींचा थाटात वाढदिवस

यूपीआयवरून काँग्रेसमध्येच विरुद्ध दिशेला तोंडे

उपोषण सोडून जरांगेंची मुंबई दौऱ्यातून माघार

“दहशतवादी गुहेत लपून नव्हते, सुरक्षित वातावरणात होते”

दरम्यान, एनएसईच्या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम अर्थात जीएमपी सध्या सुमारे ९ टक्क्यांच्या आसपास असल्याचे वृत्त आहे. मात्र, जीएमपी हा अधिकृत किंवा निश्चित सूचीबद्धीकरण दर नसतो. ग्रे मार्केटमधील मागणी आणि बाजारातील अपेक्षांनुसार त्यात मोठे बदल होऊ शकतात. कमाल किंमत पट्ट्यानुसार एनएसईचे मूल्यांकन आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील कमाईच्या सुमारे ४२.९ पट किंमत-नफा गुणोत्तरावर होत आहे. त्यामुळे कंपनीची मजबूत बाजारातील स्थिती आणि मोठा गुंतवणूकदार आधार यासोबतच तिच्या मूल्यांकनाचाही विचार महत्त्वाचा ठरणार आहे.

जून २०२६पर्यंत कॅश मार्केटमध्ये एनएसईचा वाटा सुमारे ९३.०५ टक्के होता. याच काळात एनएसईकडे १३.२४ कोटींपेक्षा अधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार होते. मात्र, कंपनीच्या आर्थिक कामगिरीसमोर काही आव्हानेही आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एनएसईचा कार्यकारी महसूल १६,६०१ कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. करानंतरचा नफा देखील १२,१८८ कोटी रुपयांवरून सुमारे १०,३०२ कोटी रुपयांवर आला. कंपनीच्या महसुलातील मोठा हिस्सा व्यवहार शुल्कातून येत असल्याने बाजारातील व्यवहारांचे प्रमाण, विशेषतः ऑप्शन्समधील व्यवहार आणि नियामक बदलांचा कंपनीच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एनएसईचा आयपीओ चर्चेत असला तरी गुंतवणूकदारांसाठी किंमत, मूल्यांकन, आर्थिक कामगिरी आणि संभाव्य जोखीम या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version