ब्रिटिश वसाहतवादी राजवटीच्या काळात भारतातून नेण्यात आलेले नागा समुदायाच्या ३९ पूर्वजांचे मानवी अवशेष अखेर मायभूमीत परतणार आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पिट रिव्हर्स संग्रहालयाने हे अवशेष नागा समुदायाकडे परत करण्यास संमती दर्शवली आहे. या निर्णयाकडे ऐतिहासिक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या परिषदेने १३ जुलै २०२६ रोजी ३९ नागा पूर्वजांचे अवशेष परत करण्यास औपचारिक मंजुरी दिली होती. नागा समुदायाने एकूण ४० मानवी अवशेष परत करण्याची मागणी केली होती. मात्र, एका अवशेषाचा नागा समुदायाशी संबंध असल्याचा स्पष्ट पुरावा नसल्याने तो परत करण्यास मंजुरी देण्यात आली नाही. पिट रिव्हर्स संग्रहालयाच्या माहितीनुसार, हे अवशेष प्रामुख्याने ब्रिटिश वसाहतवादी प्रशासक आणि मानववंशशास्त्रज्ञ जॉन हेन्री हटन आणि जेम्स फिलिप मिल्स यांनी १९१० ते १९४० या काळात ऑक्सफर्डला नेले होते. अनेक अवशेष स्वेच्छेने देण्यात आले नव्हते, तर लष्करी मोहिमांदरम्यान ते जप्त करण्यात आल्याचा उल्लेख संग्रहालयाने केला आहे.
हे ही वाचा:
महिला कर्मचाऱ्यांवरील भेदभावाच्या आरोपांमुळे आयफेल टॉवर बंद
दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझे होणार साक्षीदार?
“उद्धव प्रमाणे राज ठाकरेही राजकीय कडेलोटाकडे”
आशिया कप फायनलआधी ट्रॉफीचा पेच!
नागा समुदायाच्या प्रतिनिधींनी या प्रक्रियेसाठी अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. २०२० पासून सुरू झालेल्या परताव्याच्या प्रक्रियेत फोरम फॉर नागा रिकन्सिलिएशन (FNR) आणि त्याच्या रिकव्हर, रिस्टोअर अँड डिकॉलोनाइज (RRaD) उपक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली. जून २०२५ मध्ये नागा आदिवासी नेते, ज्येष्ठ नागरिक आणि संशोधकांचे प्रतिनिधीमंडळ पिट रिव्हर्स संग्रहालयात गेले होते. यावेळी त्यांनी पूर्वजांचे अवशेष पाहिले आणि त्यांच्या मायभूमीत पुनरागमनासाठी पुढील प्रक्रिया सुरू केली. या भेटीनंतर ‘नागा-ऑक्सफर्ड डिक्लेरेशन ऑन रिपॅट्रिएशन’ जारी करण्यात आले होते.
