अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबवण्यासाठी तेहरानकडून करण्यात आलेल्या सात दिवसांच्या शांतता प्रस्तावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवर पुन्हा हवाई हल्ले सुरू करण्याची अपेक्षा ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे, असेही वृत्त आहे.
इराणने अमेरिकेसमोर ठेवलेल्या प्रस्तावानुसार, काही अटी मान्य झाल्यास सात दिवसांच्या आत होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा जहाजांसाठी खुला करण्याची आणि त्यानंतर व्यापक शांतता करारासाठी चर्चा सुरू करण्याची तयारी तेहरानने दर्शवली होती. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी हा प्रस्ताव अमेरिकी मध्यस्थांमार्फत या आठवड्यात पाठवल्याचे सांगितले होते.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याचा प्रस्ताव हा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात होता. मात्र, ट्रम्प यांनी हा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भाषणादरम्यान ट्रम्प यांनी इराणसोबत करार करण्याचा पर्याय आणि लष्करी कारवाईचा पर्याय दोन्हींचा उल्लेख केला होता. त्याच वेळी त्यांनी अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर इराणसोबत करार होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी घट
कांडला ते गोरखपूर २,८०५ किमीची जगातील सर्वात लांब एलपीजी पाइपलाइन
शेवटच्या क्षणी जोडी बदलली अन् भारताला नेमबाजीत सुवर्ण!
दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी अमेरिकेसोबत नोव्हेंबरच्या निवडणुकांपूर्वीच करार व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत इराणचा सात दिवसांचा प्रस्ताव फेटाळल्याचे वृत्त आणि निवडणुकांनंतर पुन्हा लष्करी कारवाई होण्याची शक्यता यामुळे अमेरिका-इराण संघर्षातील राजनैतिक तोडगा पुन्हा अनिश्चित बनला आहे. मात्र, अमेरिका पुन्हा प्रत्यक्ष हवाई हल्ले कधी आणि कोणत्या स्वरूपात करेल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
