अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आज मुंबईसह राज्यभरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी मुंबईत सकाळपासूनच मोठी लगबग सुरू झाली असून, लालबाग परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, परळचा राजा यांसह विविध मोठ्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका मुंबईच्या रस्त्यांवरून मार्गस्थ झाल्या आहेत.
लालबाग गणेशगल्लीतील प्रसिद्ध मुंबईच्या राजाच्या विसर्जनाची यंदा विशेष चर्चा आहे. २२ फूट उंच मूर्तीचे विसर्जन गिरगाव चौपाटीवरून अत्याधुनिक बार्ज जहाजाच्या माध्यमातून थेट खोल समुद्रात करण्यात येणार आहे. या पद्धतीने एवढ्या मोठ्या आणि मानाच्या गणपतीचे विसर्जन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले आहेत.
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी ९ वाजता सुरू झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारतमाता सिनेमा, चिंचपोकळी ब्रिज, भायखळा रेल्वे स्थानक, दोन टाकी, कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधव बाग, व्ही. पी. रोड, प्रार्थना समाज आणि गिरगाव चौपाटी अशी मिरवणूक मार्गस्थ होत आहे.
या मार्गावर विविध ठिकाणी लालबागच्या राजाचे स्वागत केले जाणार आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयाजवळ अग्निशमन दलाकडून सायरन वाजवून सलामी दिली जाणार आहे.
बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच लालबाग परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईचा राजा, लालबागचा राजा, परळचा राजा, प्रगती क्रीडा मंडळ, राजा तेजुकायचा, रंगारी बदक चाळ, काळाचौकीचा महागणपती आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या प्रसिद्ध गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सकाळी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
हे ही वाचा:
भारतातील पहिला स्वदेशी मायक्रो-GPU विकसित
गतविजेते सात्विक-चिराग पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत बाहेर
एमपीएससी पेपरफुटीचे प्रकरणी सांगली, बुलढाणा, नवी मुंबईतून चौघे गजाआड
जेवण बनवले नाही, म्हणून आईचा जीव घेतला!
मुंबईच्या रस्त्यांवर दिवसभर गणेशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळत असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला जात आहे.
