ग्राफिक्स प्रोसेसिंगच्या क्षेत्रात भारताने महत्त्वाची पायरी गाठली आहे. आयआयटी दिल्लीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील संशोधकांनी देशातील पहिला कार्यरत आणि प्रात्यक्षिक दाखवता येणारा स्वदेशी मायक्रो-ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट अर्थात मायक्रो-GPU विकसित केला आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्राफिक्स आणि डिस्प्ले प्रोसेसिंगसाठी आयात होणाऱ्या हार्डवेअरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने मदत होऊ शकते.
या प्रकल्पाचे नेतृत्व एम टेकचे विद्यार्थी नम्मी आकाश आणि एम. रवी तेजा यांनी केले असून, प्राध्यापक जयदेव आणि प्राध्यापक कौशिक साहा यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले. संशोधकांनी तयार केलेल्या मायक्रो-GPUद्वारे प्रोग्रामेबल ग्राफिक्स रेंडरिंगचे प्रात्यक्षिक Spartan-7 FPGA प्लॅटफॉर्मवर करण्यात आले.
मायक्रो-GPU म्हणजे नेमकं काय?
GPU म्हणजे संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये चित्र, ग्राफिक्स आणि दृश्य माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी वापरला जाणारा प्रोसेसर. मोठ्या संगणकांमध्ये आणि आधुनिक एआय व मशीन लर्निंग प्रणालींमध्ये GPUचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
आयआयटी दिल्लीने विकसित केलेला मायक्रो-GPU मात्र उच्च क्षमतेच्या गेमिंग किंवा मोठ्या संगणकीय प्रणालींसाठी नसून कमी खर्चातील एम्बेडेड उपकरणांमध्ये ग्राफिक्स आणि डिस्प्ले हाताळण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
या मायक्रो-GPUचा वापर विविध उपकरणांमध्ये करता येऊ शकतो. यामध्ये औद्योगिक नियंत्रण डिस्प्ले, कमी खर्चातील ह्युमन-मशीन इंटरफेस, ई-रिक्षाच्या डॅशबोर्डवरील नेव्हिगेशन प्रणाली, छोट्या मासेमारी नौकांसाठी अंतर्गत जलवाहतूक नेव्हिगेशन टर्मिनल आणि शैक्षणिक ई-बुक रीडर्स यांचा समावेश आहे. या तंत्रज्ञानाची रचना अशी करण्यात आली आहे की ते प्रोग्रामेबल हार्डवेअर म्हणजेच FPGAवर वापरता येऊ शकते. भविष्यात हे तंत्रज्ञान थेट चिपमध्येही समाविष्ट करण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
इराणमधील आंदोलक जुळ्या मुली तुरुंगात… चेहरे सुजलेले, केस उपटून काढलेले, हाडे मोडलेली!
मोबाइलपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत; १२ वर्षांत ‘मेक इन इंडिया’ची मोठी भरारी
शेवटच्या क्षणी जोडी बदलली अन् भारताला नेमबाजीत सुवर्ण!
“पेजर आठवतात का?” नेतन्याहूंनी पेजर दाखवत हिजबुल्लाहला विचारला प्रश्न
मायक्रो-GPUच्या या प्राथमिक आवृत्तीनंतर संशोधकांनी पुढील टप्प्याची तयारी सुरू केली आहे. आता ८ ते १६ कोअरच्या व्हेक्टर-स्टाइल ग्राफिक्स प्रोसेसर आर्किटेक्चरवर काम करण्याची योजना आहे. त्यासाठी ऑप्टिमाइज्ड कम्पायलर आणि ग्राफिक्स सॉफ्टवेअर टूलचेनही विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय, या तंत्रज्ञानाचा ६५ नॅनोमीटर ASIC प्रक्रियेवर प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट तयार करण्याचा संशोधकांचा मानस आहे. त्यासाठी ASIC विकास, सिस्टीम इंटिग्रेशन आणि पुढील व्यावसायिकीकरणासाठी निधी मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
