जर्मनीतील लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडी इंडियाने आपल्या नव्या कॉम्पॅक्ट लक्झरी एसयुव्ही ऑडी Q3ची भारतात स्थानिक असेंब्ली सुरू केली आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील SAVWIPLच्या प्रकल्पात या नव्या मॉडेलची असेंब्ली केली जात आहे. ऑडी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नवी ऑडी Q3 भारतीय बाजारात १६ ऑक्टोबर २०२६ रोजी लाँच केली जाणार आहे. या एसयुव्हीमध्ये २.०-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ऑडीची लोकप्रिय क्वात्रो ऑल-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानही मिळणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, नव्या पिढीतील Q3मध्ये कॉम्पॅक्ट लक्झरी एसयुव्हीची व्यावहारिकता आणि दमदार कामगिरी यांचा समतोल साधण्यात आला आहे. या वाहनात आपल्या सेगमेंटमधील अनेक नवीन आणि अत्याधुनिक फीचर्स तसेच तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. आधुनिक लक्झरी वाहन ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या एसयुव्हीची रचना करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. ग्राहकांना नव्या ऑडी Q3चे बुकिंग ऑडी इंडियाच्या वेबसाइटवरून, MyAudi Connect अॅपद्वारे किंवा देशभरातील ऑडी डीलरशिपमध्ये करता येणार आहे.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष अरोरा यांनी सांगितले की, नव्या ऑडी Q3च्या भारतातील उत्पादनाची सुरुवात ही समूहासाठी महत्त्वाची उपलब्धी आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील प्रकल्पाची मजबूत उत्पादन क्षमता आणि भारतात आपल्या ब्रँडचा विस्तार करण्यासाठी कंपनीची बांधिलकी दिसून येते. “भारतामध्ये नव्या ऑडी Q3चे उत्पादन करताना आम्हाला अभिमान वाटतो. ऑडी जगभरात ज्या दर्जासाठी, अचूकतेसाठी आणि अभियांत्रिकी कौशल्यासाठी ओळखली जाते, तोच दर्जा या वाहनात कायम ठेवण्यात आला आहे,” असे पीयूष अरोरा यांनी सांगितले.
हे ही वाचा:
सिक्कीमच्या रिंबी गावावर भूस्खलनाचा कहर
झुरिच-दिल्ली फ्लाइटपूर्वी अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आलेला वैमानिक निलंबित
ज्ञानेशकुमार, २४ तासात राजीनामा द्या, नाहीतर २ ऑक्टोबरपासून आंदोलन
राहुल गांधींना आरसा दाखवणारा चेन्निथलांचा जुना व्हीडिओ व्हायरल
ऑडी इंडियाने २०२५ मध्ये सुमारे ४,५१० वाहनांची विक्री केली होती. लक्झरी वाहन बाजारातील बदलत्या परिस्थितीनंतरही कंपनीच्या विक्रीत स्थिरता राहिल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, GST 2.0 लागू झाल्यानंतर लक्झरी वाहन खरेदीदारांचा विश्वास वाढला आणि बाजाराला त्याचा फायदा झाला, असा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि चलन विनिमय दरातील चढ-उतारामुळे ऑडी इंडियाने १ एप्रिल २०२६पासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये २ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती.
