घरराजकारणसत्ताबदल लोकशाही मार्गानेच हवा!

सत्ताबदल लोकशाही मार्गानेच हवा!

प्रियांका चतुर्वेदींचा संजय राऊतांना टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. अल्बानियातील हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भारतानेही अशा घटनांमधून धडा घ्यावा, असे सूचित केले होते. मात्र, प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्या या भूमिकेला स्पष्टपणे विरोध केला आहे. सरकार बदलायचे असेल, तर ते जनतेची मने जिंकून आणि लोकशाही मार्गानेच बदलले पाहिजे. संसद किंवा सर्वोच्च न्यायालय जाळणे, तसेच देशात अराजकता निर्माण करणे हा सत्ताबदलाचा मार्ग असू शकत नाही, असे त्यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

अल्बानियातील आंदोलनादरम्यान आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालय, संसद आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य केले होते. या घटनांचा संदर्भ देत राऊत यांनी भारतातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले होते. मात्र, लोकशाही संस्थांवर हल्ले करण्याचे समर्थन आपण करत नसल्याचे प्रियांका चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले. ‘माझा पक्ष जनतेची मने जिंकून सत्ताबदल घडवून आणेल. त्यासाठी आम्ही लढा दिला आहे. सत्ताबदल होणारच; पण तो लोकशाही मार्गाने झाला पाहिजे. निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता असावी, यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे,’ असे त्या म्हणाल्या.

या मुलाखतीत संजय राऊत यांच्यामुळे पक्षात अडचणी निर्माण होतात का, असा थेट प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. मात्र, त्यांनी हो किंवा नाही, असे उत्तर देणे टाळले. ‘या प्रश्नाचे उत्तर केवळ हो किंवा नाही, असे देता येणार नाही. कोणालाही प्रमाणपत्र देण्याची मला गरज नाही. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आणि घडामोडी सर्वांसमोर आहेत,’ असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये ‘आप’ला गळती; आणखी एका आमदाराचा राजीनामा

प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’च्या ११ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

दिल्लीच्या प्रदूषण मोहिमेत पहिल्याच दिवशी ६८ लाखांचा दंड

‘मे डे’ कॉलनंतर काही क्षणांतच फ्लोरिडात खासगी जेट कोसळले

दरम्यान, पक्षातील नेतृत्वाबाबत त्यांनी कोणतीही संदिग्धता ठेवली नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच आपले नेते असल्याचे सांगत त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे आणि यापुढेही करत राहीन. पक्षाने मला जी जबाबदारी दिली, ती मी पार पाडली आहे,’ असे त्या म्हणाल्या. आपल्या भूमिकेमुळे पक्षाने काही आक्षेप घेतला आहे का, असे विचारले असता पक्षाकडून अद्याप काहीही सांगण्यात आले नसल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षाबद्दल आपल्याला पूर्ण आदर आणि विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version