घरराजकारणदोन दिवसांत दुष्काळ जाहीर करणार

दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करणार

मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

- Advertisement -

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात येईल आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. लातूर जिल्ह्यातील औसा येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

लातूर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सुमारे ५० टक्के पाऊस झाल्याचे सांगण्यात आले असून सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि इतर आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पंचनामे करणे ही कायदेशीर प्रक्रिया असली तरी मदत देताना सरसकट नुकसानभरपाईचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीच राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही परिस्थिती १९७२ नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ असल्याचे सांगितले. त्यानुसार येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

सिंधू जल करार प्रकरणात पाकिस्तानचा लवादच बेकायदेशीर

काश्मीर प्रश्नात एर्दोगान यांची पुन्हा लुडबूड

एनएसईने आणला शेअर निवडीचा ‘लेन्स’

नाशिकमध्ये ‘ज्ञानकुंभ’ विद्वत संगोष्ठीचे आयोजन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणाऱ्या कामांनाही गती दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी आणि नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच अन्नधान्य उपलब्ध करून देण्यावरही सरकारचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीही स्थापन केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती दुष्काळासंदर्भातील माहिती आणि उपाययोजनांचा आढावा घेणार आहे.

शेतकऱ्यांना अश्रू अनावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील जावू आणि औसा तालुक्यातील खरोसा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांना समोर पाहताच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. शेतकऱ्यांनी करपलेले सोयाबीन मुख्यमंत्र्यांच्या हाती देत आपली व्यथा मांडली. काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. “आभाळ फाटलंय साहेब, आता तुम्हीच आधार द्या,” अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. एका शेतकऱ्याने शेतीसाठी केलेला खर्च आणि पिकाचे झालेले नुकसान सांगताना भावुक होत फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version