अदानी उद्योगसमुहाचे प्रमुख आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी कितीही आगपाखड करत असले तरी काँग्रेसशासित राज्यात मात्र अदानी हे हवेच असतात. कर्नाटकमधील एका प्रकल्पासाठी अदानी यांचीच मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. शिवकुमार यांच्या घरी अदानी आले आणि त्याची चर्चा झाली.
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड बंगळुरूमधील १६.७५ किलोमीटर लांबीच्या बोगदा मार्ग प्रकल्पातील दोन्ही टप्प्यांसाठी सर्वांत कमी बोली लावणारी कंपनी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने तिचे महत्त्व वाढले आहे. मात्र, या भेटीबाबत मुख्यमंत्री कार्यालय किंवा अदानी समूहाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. समोर आलेल्या चित्रफितीत मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार गौतम अदानी यांना निरोप देताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्राला भेट दिल्यानंतर विमानतळाकडे जात असताना गौतम अदानी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
हे ही वाचा:
साखर महागण्यामागे नेमकं काय? इथेनॉल की उत्पादनातील घट?
साखर महागली, चहादेखील ‘उकळणार’
राहुल गांधींचे सोनिया गांधींना ‘पेलेट गन’ मधून कव्हर फायर
बोगदा मार्ग प्रकल्पाशी भेटीचा संबंध?
गौतम अदानी आणि डी.के. शिवकुमार यांची भेट होण्याची वेळ महत्त्वाची मानली जात आहे. डिसेंबर २०२५ मध्ये अदानी एंटरप्रायझेसने सेंट्रल सिल्क बोर्ड ते हेब्बाळपर्यंत प्रस्तावित १६.७५ किलोमीटर बोगदा मार्ग प्रकल्पातील दोन्ही टप्प्यांसाठी सर्वांत कमी बोली लावली होती. बंगळुरू स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने डिसेंबर २०२५ मध्ये उघडलेल्या आर्थिक बोलींनुसार, अदानी एंटरप्रायझेस दोन्ही टप्प्यांमध्ये सर्वांत कमी बोलीदार म्हणजेच एल-१ ठरली होती.
राज्य सरकारने या संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे १७,६९८ कोटी रुपये निश्चित केली होती. त्याचवेळी अदानी एंटरप्रायझेसने सुमारे २२,२६७ कोटी रुपयांची बोली लावली. म्हणजेच कंपनीची बोली सरकारी अंदाजापेक्षा सुमारे ४,६०० कोटी रुपये अधिक आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या विशेष उद्देश कंपनीने म्हणजेच बी-स्माइलने २९ मे रोजी राज्य सरकारकडे संबंधित प्रस्तावाची फाइल पाठवली होती.
अदानी एंटरप्रायझेस सर्वांत कमी बोली लावणारी कंपनी ठरली असली, तरी तिला अद्याप या प्रकल्पाचे अधिकृत कंत्राट देण्यात आलेले नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अदानींची बोली प्रकल्पाच्या मंजूर अंदाजित खर्चाच्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याने आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे.
बंगळुरूचा हा बोगदा मार्ग प्रकल्प डी.के. शिवकुमार यांच्या प्रमुख पायाभूत सुविधा योजनांपैकी एक मानला जातो. बंगळुरू विकासमंत्री असतानाही त्यांनी या प्रकल्पाला सातत्याने पाठिंबा दिला होता. मात्र, नागरिक संघटना आणि शहरी वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून या प्रकल्पाला विरोधही करण्यात आला आहे. प्रकल्पाचा खर्च, वाहतुकीवर होणारा परिणाम आणि बंगळुरूच्या एकूण वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
