घरराजकारणमॉस्कोमध्ये जयशंकर, बीजिंग मध्ये डोवाल

मॉस्कोमध्ये जयशंकर, बीजिंग मध्ये डोवाल

'ब्रिक्स' आधीच्या गाठीभेटी की, अमेरिका विरोधी रणनीती

गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून भारत – अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर नवी भूराजकीय समीकरणे उदयास येऊ लागली आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा  ताजा रशिया दौरा आणि त्याचवेळी भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांची बीजिंग भेट याला वेगळे महत्त्व आले आहे. जागतिक स्तरावरील नव्या भूराजकीय संबंधांचे गणित या भेटींमागे आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

चीन आणि रशिया हे अमेरिकेचे प्रमुख स्पर्धक आहेत. मात्र त्यांच्याशी चढाओढ करताना त्यात भारताला भरडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने या भेटींना महत्त्व प्राप्त होत आहे. अमेरिकाविरोधी रणनीतीचा भाग आणि आगामी ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी होणारी संभाव्य भेट या अनुषंगाने या भेटींना महत्त्व आले आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या मॉस्कोमध्ये आहेत, जिथे त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली, तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सीमा प्रश्नावर चिनी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बीजिंगमध्ये आहेत. ट्रम्प हे अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी अमेरिकेला महान बनविण्याच्या प्रयत्नात विविध देशांवर टॅरिफचे अस्त्र त्यांनी उगारले. भारतावरही टॅरिफची सातत्याने टांगती तलवार राहिली. इराणशी केलेल्या युद्धानंतर भारताने रशियाकडून तेल घेऊ नये म्हणून निर्बंध लादले. अशा परिस्थितीत विविध शक्तिशाली देशांशी भारताने संवादाचे मार्ग खुले ठेवत अमेरिकेला आपल्या सार्वभौमत्वाची चुणूक दाखविली.

डोवाल यांचा चीन दौरा हा दोन्ही देशांदरम्यानच्या सीमा विवादावरील संरचित संवादाचा एक भाग आहे. विशेष प्रतिनिधी यंत्रणेमध्ये त्यांचे चिनी समकक्ष असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी त्यांची चर्चा होणार आहे. जून २०२० मध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर अनेक वर्षे तणाव राहिल्यानंतर भारत-चीनमधील राजनैतिक संपर्क वाढत असताना ही चर्चा होत आहे. या चर्चेत सीमा प्रश्न, द्विपक्षीय संबंध तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

हे ही वाचा:

तळोज्यात ४,७१० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट; १५ जणांवर गुन्हा

भाजप आमदाराच्या मुलीने महिला पोलीसाच्या कानशिलात लगावली

अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध पेटले

गणेश मिरवणुकीवर अंडी फेकणाऱ्याला ३६ तासात पकडले!

 

सीमा चर्चेसाठी भारताचे नियुक्त विशेष प्रतिनिधी असलेले डोवाल हे वांग यी यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. वांग यी हे या चर्चेच्या यंत्रणेत डोवाल यांचे चिनी समकक्ष आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांचीही भेट घेतली. डोवाल यांच्या या बैठकींना १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्य माघारीच्या प्रक्रियेमुळे काही तातडीचे लष्करी तणाव कमी झाले असले, तरी व्यापक सीमा विवाद अद्याप सुटलेला नाही. अरुणाचल प्रदेश हा या सीमा विवादातील सर्वांत संवेदनशील मुद्द्यांपैकी एक आहे. चीन संपूर्ण भारतीय राज्य अरुणाचल प्रदेशावर दावा करतो आणि त्याला “झांगनान” अर्थात दक्षिण तिबेट असे संबोधतो. भारताने हा दावा सातत्याने फेटाळून लावला आहे.

तिकडे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे पुतिन यांच्याशी हस्तांदोलन करत आहेत. एस. जयशंकर यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी व्यापक चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित केले. पश्चिम आशियातील संकटामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला ऊर्जा आणि खतांचा अखंडित पुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. जयशंकर यांनी आपल्या प्रारंभीच्या भाषणात दोन्ही देशांमधील वाढत्या व्यापार तुटीचा मुद्दा देखील उपस्थित केला. ही तूट ६.६ अब्ज डॉलरवरून ५० अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.

भारत आणि रशियामधील द्विपक्षीय व्यापार गेल्या काही वर्षांत चार पटींपेक्षा जास्त वाढला असून तो २०२१-२२ मधील १३ अब्ज डॉलरवरून २०२३-२४ मध्ये जवळपास ६० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

दोन्ही बाजूंमध्ये आता युरेशियन इकॉनॉमिक युनियनमार्फत मुक्त व्यापार करारासाठी (FTA) सक्रियपणे वाटाघाटी सुरू आहेत. रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांनी सांगितले की, व्यापाराचे प्रमाण वाढवण्याबरोबरच त्याची रचना अधिक वैविध्यपूर्ण करण्यावर रशियाचा भर आहे.

ते म्हणाले की, रशियाकडून पारंपरिकरित्या होणाऱ्या इंधन आणि खनिज खतांच्या पुरवठ्याबरोबरच कृषी व खाद्यपदार्थ, यंत्रसामग्री, धातू आणि वनीकरण उत्पादनांमधील व्यापारही वाढत आहे. दुसरीकडे, भारताकडून रशियाला औषधे, कृषी उत्पादने, औद्योगिक कच्चा माल, उपकरणे व सुटे भाग तसेच हलक्या उद्योगातील वस्तूंची निर्यात केली जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version