कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील मंदिरात भाजप आमदाराच्या मुलीने महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. तुमकुरु ग्रामीण मतदारसंघाचे भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या आणि महिला पोलीस उपनिरीक्षक सविता बी. पाटील यांच्यात मंदिरात वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
ही घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे सव्वाआठच्या सुमारास भीम अमावस्या उत्सवादरम्यान अर्ठी उक्कडा मंदिरात घडली. ऐश्वर्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. मात्र, गर्भगृहात प्रवेश करण्यास विलंब होत असल्याने त्यांनी पोलिसांकडे नाराजी व्यक्त केली. याच मुद्द्यावरून त्यांचा बंदोबस्तावर असलेल्या महिला पीएसआय सविता पाटील यांच्याशी वाद झाल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाद वाढल्यानंतर ऐश्वर्या यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केली, त्यांच्या कामात अडथळा आणला आणि अखेर त्यांना थप्पड मारल्याचा आरोप आहे. सीसीटीव्हीमध्ये दोघींमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर ऐश्वर्या यांनी पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे दिसत आहे. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यानेही प्रत्युत्तरादाखल ऐश्वर्यांना मारल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
सात वर्षांनी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर?
अदानी एंटरप्राइझकडून मुंबई पोलिसांना १५ कोटींच्या गाड्या
अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध पेटले
फक्त डीआरडीओ नव्हे देशातील उद्योगही तयार करणार क्षेपणास्त्रे
या घटनेनंतर सविता पाटील यांनी कायथानहळ्ळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ऐश्वर्या यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ऐश्वर्या यांच्या बाजूनेही पोलिस अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांना गर्भगृहात प्रवेश दिला, मात्र आपल्याला प्रवेश नाकारण्यात आला, तसेच महिला अधिकाऱ्याने आपल्याशी अपशब्द वापरल्याचा दावा ऐश्वर्या यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात परस्पर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
दरम्यान, भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. आपल्या मुलीने महिला पोलिसाला थप्पड मारल्याचा व्हिडीओ आपण पाहिलेला नसल्याचे सांगतानाच, वादाच्या आधी पोलिस अधिकाऱ्याने आपल्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. राजकीय पदावरील व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याशी केलेल्या कथित गैरवर्तनामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
