घरसंपादकीयराहुल गांधींचे पुन्हा 'मिलते है ब्रेक के बाद...'

राहुल गांधींचे पुन्हा ‘मिलते है ब्रेक के बाद…’

आकाशवाणी भवन, जंतर मंतर, सर्वोच्च न्यायालय आदी ठिकाणी बराच धिंगाणा घातल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा परदेशात ब्रेकवर गेलेले आहेत. काल ते व्हिएतनामला रवाना झाले. तिथे सालाबादप्रमाणे त्यांच्या काही गाठीभेटी होतील. त्याची भारतात उलटसुलट चर्चा होईल, परंतु त्यांना याचा फार फरक पडताना दिसत नाही. दोन कॉकरोच तिहार तुरुंगात आहेत. १ नोव्हेंबरला काँग्रेसने नवी दिल्लीतील रामलीला मैदानात रॅलीचे आयोजन केलेले आहे. या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून राहुल गांधी पर्यटनाला निघालेले आहेत.

सत्यनारायणाच्या पूजेचे निमंत्रण देऊन यजमान स्वतः घरातून गायब व्हावा तसा प्रकार राहुल गांधी यांनी केलेला आहे. फरक एवढाच, त्यांचा संबंध सत्यनारायणाशी कमी आणि असत्यनारायणाशी जास्त आहे. सत्ताधारी आणि विरोधक, राष्ट्रभक्त आणि देशविरोधक यांच्यात तुंबळ संघर्ष सुरू आहे. त्याचा निकाल लागण्याच्या आधी राहुल गांधी यांना पर्यटनाची सुरसुरी यावी, हे अनाकलनीय असले तरी ते त्यांच्या स्वभावाला धरून आहे. एखादे नावडते काम जेव्हा माणूस करतो, तेव्हा ती ढकलगाडी असते; कंटाळत काम करायचे, रविवार कधी येतोय त्याची वाट पाहायची. ज्याला कामात गंमत असते, कामावर निष्ठा असते, त्याचा आठवडा कसा जातो ते त्यालाही कळत नाही. राहुल गांधी यांची समस्या तीच आहे. ते पूर्णवेळ राजकारणी नाहीत. राजकारण हा त्यांचा पिंड नाही. राजकरणाबाबत ते गंभीर नाहीत. पंतप्रधान मोदी किंवा अमित शाह यांनी गेल्या १२ वर्षांच्या काळात सुट्टी घेतल्याचे किंवा ब्रेक घेतल्याचे ऐकिवात नाही. राहुल गांधी मात्र वर्षातून दोनदा ब्रेक घेतात. दोघांच्या कामगिरीमध्ये जो फरक आहे, त्याला दोन वेगळ्या मानसिकताही कारणीभूत आहेत.

हे ही वाचा:

मोहन भागवतांचे भाषण अत्यंत प्रेरणादायी!

‘ड्रग्ज माफियांना पाताळातून शोधून बाहेर काढू’

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला

दहशतवादावर दुटप्पीपणा खपवून घेणार नाही!

निसर्गाचा प्रत्येक रंग असलेल्या भारतात राहुल गांधी कधीच रमत नाहीत. इथे काय नाही? हिमशिखरे, वाळवंट, ऐतिहासिक गड-किल्ले, पुरातन वास्तू, मंदिरे, समुद्रकिनारे, जंगले… परंतु राहुल गांधींना यापैकी कशातच रस नाही. त्यांना प्रत्येक वेळी मोह पडतो परदेशातील स्थळांचा. बहुधा तिथे ते काय करतात, कोणाला भेटतात, कोणासोबत असतात, याबाबत कोणालाच पत्ता लागत नाही; कदाचित म्हणूनच ते परदेशात जात असावेत. बँकॉकमध्ये जी तपश्चर्या त्यांना करायची असते, ती भारतात करणे शक्य होत नसावे.

भारतात आज दसरा साजरा होतो आहे. हिंदूंचा मोठा सण. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. आपल्या इथे सणावाराला घरदार बंद करून पर्यटनाला जाण्याची परंपरा नाही. सणाच्या दिवशी घरात प्रकाश हवा. देवापुढे दिवा हवा. सणवाराला हिंदू धार्मिक असो वा नसो, त्याचे देवघर उजळलेले असते. गंध-पुष्प अर्पण करून देवतांची पूजा केली जाते. ठिकठिकाणी रावणदहन केले जाते. दिल्लीतील रामलीला, रावणदहन प्रसिद्ध आहे. इथला हिंदू रावणदहन पाहण्यासाठी रामलीला मैदानात गर्दी करतो. परंतु स्वतःला दत्तात्रेय गोत्रधारी म्हणवणारे राहुल गांधी सणवार सोडून परदेशात पळ काढतात. यांना हिंदू देवादिकांची आठवण फक्त निवडणुकीच्या काळात होते.

केंद्र सरकारच्या विरोधात राहुल गांधी यांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. व्होट चोरी, एसआयआरच्या मुद्द्यावर खोटे नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला. एखादी गोष्ट खरी असो वा खोटी, ती सतत बोलल्यावर काही लोक तरी विश्वास ठेवतात. हळूहळू या लोकांची संख्या वाढू लागते. या थिअरीवर राहुल गांधी यांचा विश्वास आहे. प्रत्यक्षात किती लोकांनी राहुल गांधी यांच्या थापांवर विश्वास ठेवला आहे, कोण जाणे! परंतु प्रशांत भूषण आणि नेहा बोरा यांनी त्यांच्या सगळ्या प्रयत्नांवर बादलीभर पाणी सांडले. रिजीम चेंजचे बांगलादेश मॉडेल हाच त्यांचा अजेंडा आहे, ही बाब जनतेसमोर आणली. मोर्चा घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाणे आणि तिथे याचिका दाखल करणे त्यांना शेकणार अशी चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या मोर्चाची दखल घेतली. “आम्हाला कोणी घाबरवू शकत नाही,” एवढी प्रतिक्रिया देऊन सर्वोच्च न्यायालय थांबलेले नाही. सर्वोच्च न्यायालयात जमावाने केलेल्या घुसखोरीच्या संदर्भात त्यांनी राहुल गांधी, अखिलेश यादव यांना नोटिसा जारी केल्या आहेत, खुलासा मागवला आहे.

आता एकाच वेळी न्यायालयात याचिका आणि रस्त्यावर अराजकवादी आंदोलने शक्य नाहीत. नेहा बोरा आणि प्रशांत भूषण यांनी त्यांचे पितळ उघडे पाडल्यामुळे ते अधिकच अडचणीत आले आहेत. फ्रान्स, इटलीत जे काही घडते आहे, त्यामुळे भारतीयांचे डोळे बऱ्यापैकी उघडले. राहुल गांधी आणि त्यांच्या साथीदारांना माघार घ्यावी लागली.

जे भोग सध्या कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या वाट्याला आले आहेत, ते उद्या राहुल गांधी यांच्या वाट्यालाही येऊ शकतात. दिपकेने दोन वेळा पीस बाँड भरला आहे. नेहा बोरालाही बाँड भरायला सांगण्यात आले आहे. परंतु तिने सध्या तरी हे थांबवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रांका आणि दास तिहारमध्ये बसले आहेत. राहुल गांधींनी सोशल मीडियावरून डोळा मारला, त्याचाच बहुधा कॉकरोच मंडळींना अपशकून झाला आहे. आशितोष रांका, सौरव दास हे दोन कॉकरोच तिहार तुरुंगात गेल्यानंतर राहुल गांधींनी एका पोस्टच्या पलीकडे काही केलेले नाही. काही करणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. पक्षातील नेतेही कोरडी हळहळ व्यक्त करताना दिसतायत.

देशाची कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे पावावर लावायचा लोणी (बटर). कशीही सुरी फिरवायची आणि पावावर फिरवायची, असा सौरव दासचा गैरसमज झाला होता. सगळी कॉकरोच टोळी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवत होती. इतरांनी ते उडवावे यासाठी प्रोत्साहन देत होती. तिहारमधील मुक्कामामुळे ‘कानून के हात’ किती लांब असतात, याची त्यांना जाणीव व्हायला हरकत नाही. कॉकरोचवर कारवाई हा राहुल गांधी यांच्यासाठीही इशारा होता. दोन वेळा पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतले आहे; आता फक्त उचलून गजाआड टाकणे बाकी आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेऊन राहुल गांधी यांनी त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

अनेक भाजप समर्थकांना असे ठामपणे वाटते की, राहुल गांधी यांचा हा बेभरवशी स्वभाव, त्यांचे लहरी राजकारण, एकांगी विचार करण्याची पद्धती भाजप आणि केंद्र सरकारच्या पथ्यावर पडत असल्यामुळे राहुल गांधी यांच्यावर म्हणावी तशी कठोर कारवाई कधीच केली जात नाही. भाजपचे नेते असा विचार करतील तर समजू शकतो, परंतु एक पक्ष म्हणून काँग्रेसची अशी काय मजबुरी आहे की, सतत गर्तेच्या दिशेने नेऊनसुद्धा त्यांना राहुल गांधी यांना सोडवता येत नाही? प्रश्न विचारणारे नेते पक्षाच्या बाहेर पडले. इतरांमध्ये कुवत नाही. थोडीबहुत आहे, त्यांना कोपऱ्यात ढकलण्यात आले आहे. राहुल गांधी आणि सोनिया यांना आव्हान देणारी व्यक्तीच पक्षात शिल्लक नाही की कमकुवत नेतृत्व ही काँग्रेसच्या नेत्यांची गरज आहे? इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात, इतकेच काय सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे असताना त्यांचा आदेश धाब्यावर बसवणे अशक्य होते. अलीकडे अशी परिस्थिती आहे की, अशोक गेहलोत असोत, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असोत किंवा पंजाबचे नेते चरणजीत चन्नी असोत, हे सगळे नेते सोयीनुसार राहुल गांधी यांचे म्हणणे ऐकतात; अन्यथा साफ दुर्लक्ष करतात. ब्रिटिशांच्या काळात संस्थानिक जसे नामधारी झाले होते, तशीच परिस्थिती सध्या राहुल आणि सोनिया यांची आहे. यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व नसेल तर पक्षात नेतृत्वावरून साठमारी होईल, असेल तर आपल्या सोयीने त्यांना हाताळता येईल, अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचीही मानसिकता झालेली आहे.

दरवेळी सुट्टीवर गेल्यानंतर राहुल गांधी यांचा अनोळखी अज्ञात व्यक्तीसोबतचा एखादा तरी फोटो व्हायरल होतो. भारतीयांना राहुल गांधी यांच्या नव्या फोटोची यावेळीही प्रतीक्षा आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version