काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १ नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलनाची हाक दिली असून त्यासाठी १० लाख लोक येतील असा दावा काँग्रेसतर्फे केला जात आहे. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर हे आंदोलन होणार असल्यामुळे दिल्लीतील व्यापारी प्रचंड नाराज आहेत. या आंदोलनामुळे कोट्यवधींचे नुकसान होणार असल्याची त्यांची तक्रार आहे. तरीही राहुल गांधी मात्र आंदोलनावर ठाम आहेत. उलट, त्यांनी सोमवारी दिल्लीतील व्यापाऱ्यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली. ही पोस्ट लिहून व्यापाऱ्यांच्याच खांद्यावर आंदोलन थांबवण्याचा भार राहुल गांधींनी टाकला आहे. मोदींना तुम्ही ज्ञानेश कुमारांना हटवायला सांगा मी आंदोलन ३० सेकंदांत थांबवतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (सीटीआय) या व्यापारी संघटनेने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणारी इंडिया आघाडीची नियोजित सभा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. दिवाळीच्या खरेदीच्या महत्त्वाच्या काळात या सभेमुळे सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. मात्र राहुल गांधी हे आंदोलन करण्यावर ठाम आहेत. या आंदोलनासाठी १० लाख लोक जमा होतील अशी तयारी काँग्रेसकडून केली जाणार असल्याचा दावाही केला जात आहे.
राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले, “दिल्लीतील प्रत्येक व्यापाऱ्याला सांगू इच्छितो : आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचे म्हणणे ऐकत आहोत. सरकारने मेट्रो बंद केली, आमचे रस्ते बंदिस्त केले आणि आपल्या राजधानीला जणू टाळे ठोकले. जेव्हा मतांचीच चोरी होते, तेव्हा काहीही सुरक्षित राहत नाही. तुमचे दुकान, तुमची बचत किंवा तुमच्या मुलांचे भविष्यही नाही. मोदींना सांगा की त्यांनी आरोपी क्रमांक ४, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे. तसे झाल्यास ३० सेकंदांत आंदोलन थांबेल.”
हे ही वाचा:
राजकारणातील भाषेचा स्तर घसरतोय!
राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या
गृह, वित्त मंत्रालयाच्या इमारतीत धुराचे लोट
ड्रग्ज मुक्त भारत मोहीम रिजीम चेंजवाल्यांचे पेकाट मोडणार
दिल्लीतील व्यापाऱ्यांनी आंदोलनांमुळे व्यवसायाचे नुकसान होत असल्याचे सांगत काँग्रेस आणि विरोधी पक्षांना निदर्शने थांबवण्याचे आवाहन केले होते. व्यापारी संघटनांच्या मते, आंदोलनांच्या काळात अनेक व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवावी लागत आहेत.
सीटीआयचे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीजेच्या आधी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे नमूद केले आहे. यंदा धनत्रयोदशी ६ नोव्हेंबर, दिवाळी ८ नोव्हेंबर आणि भाऊबीज १० नोव्हेंबर रोजी आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, धनत्रयोदशीच्या काळात दिल्लीमध्ये सोने-चांदी, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, सुका मेवा, मिठाई, वाहने, मालमत्ता आणि भेटवस्तू अशा विविध क्षेत्रांमध्ये सुमारे २५,००० कोटी रुपयांचा व्यापार होतो. त्यामुळे उत्सवाच्या काळात मोठ्या सभा आणि वाहतुकीवरील निर्बंध टाळावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
सीटीआयने असा दावाही केला आहे की, ऑक्टोबर महिन्यात कनॉट प्लेस, इंडिया गेट आणि मध्य दिल्लीतील विविध ठिकाणी झालेल्या सभा, मोर्चे आणि रस्ते बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांना सुमारे ३,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इंडिया आघाडीची प्रस्तावित सभा ही मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत (एसआयआर) कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांविरोधातील आंदोलनाचा भाग आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कारवाईची मागणी करत आहेत.
