महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली. महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षणाला (एसआयआर) आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला विरोध करण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचवेळी कॉक्रोच जनता पार्टीनेही याच मुद्द्यावरून पुकारलेल्या आंदोलनालाही ठाकरे बंधूंनी पाठिंबा दर्शविला आहे.
ठाकरे बंधूंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत सदर घोषणा केली. या मोर्चाला मुंबईतील भायखळा येथून सकाळी ११.३० वाजता सुरुवात होईल आणि तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत जाणार आहे. या मोर्चात सहभागी होणारे नागरिक केवळ तिरंगा घेऊन सहभागी होतील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले की, मोर्चाची सुरुवात भायखळ्यापासून होऊन तो मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत जाईल. महापालिका मुख्यालयासमोर जाहीर सभा होणार आहे. या सभेत कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे असणार नाहीत. “आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात चालणार आहोत. सत्ताधारी पक्षांनीही आमच्यासोबत यावे, असे आमंत्रण आहे. देशात आणि राज्यात अनेक आंदोलने सुरू आहेत. आपल्या सर्वांचा उद्देश समान आहे,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
वाकोल्यात विषारी वायूची बाधेमुळे सफाई कामगाराचा मृत्यू
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
पॉलिसीबाजारचा शेअर ४३ टक्क्यांनी कोसळला
गोल्डी ब्रार एफबीआयच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हा मोर्चा कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाला लक्ष्य करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला नाही. गेल्या काही वर्षांतील निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात हा मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी आघाडीतील पक्षांसह सर्व राजकीय पक्षांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही संयुक्त घोषणा झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, या मुद्द्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनांना त्यांचा पक्ष पाठिंबा देत आहे. २ ऑक्टोबर रोजी कॉक्रोच पार्टीकडून प्रस्तावित आंदोलनालाही शिवसेना (उबाठा) पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांनी सहभागी होणे आवश्यक नसते आणि प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, भविष्यात निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त विरोधक आंदोलनाची आवश्यकता भासल्यास सर्वजण एकत्र येऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले.
