उत्तर प्रदेशच्या २०२७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांचे जाहीर कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘योगी नाहीत, तर उत्तर प्रदेश नाही. योगी हे हिंदुत्वाचा सर्वात मोठा चेहरा आहेत,’ असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या राऊत यांनी यावेळी योगींच्या नेतृत्वाचे समर्थन केल्याने त्यांच्या विधानाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. आगामी निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवावी, अशी भूमिका या विधानातून दिसून येत आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केले असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. ते सक्षम नेते आहेत आणि आमचेही योगींवर खूप प्रेम आहे, असे राऊत म्हणाले. हिंदुत्वाच्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांचे स्थान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळेल आणि निवडून आलेले बहुतांश आमदार आपल्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास योगींना असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत नेतृत्वाच्या चर्चांमध्ये राऊत यांच्या विधानाची भर पडली आहे.
हे ही वाचा :
जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत
‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!
महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?
मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर
दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. भाजप कोणत्याही एका व्यक्तीच्या नावावर नव्हे, तर कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतो. निवडणुकीनंतर विजयी आमदारांची बैठक होईल आणि केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल, असे मौर्य यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे, हे सर्वांना माहीत असल्याचे सूचक विधान योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्यामुळे भाजपमध्ये योगींच्या नेतृत्वाबाबत नेमकी काय भूमिका घेतली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांवरही संजय राऊत यांनी भाष्य केले. कोणत्याही राजकीय पक्षात सर्व नेते नेतृत्वावर समाधानी असतीलच असे नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख केला. प्रत्येक पक्षात मतभेद आणि नाराजी असू शकते, असे सांगतानाच त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले. २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला अद्याप काही महिने बाकी असले, तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आणि पक्षांतर्गत नेतृत्वाचा मुद्दा आतापासूनच चर्चेत आला आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत यांच्या विधानामुळे या राजकीय चर्चेला नवा आयाम मिळाला आहे.
