ठाकरे बंधूंमध्ये स्वीकृत नगरसेवकावरून कडवटपणा?

स्वीकृत नगरसेवकावरून मिठाचा खडा पडल्याची चर्चा

ठाकरे बंधूंमध्ये स्वीकृत नगरसेवकावरून कडवटपणा?

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या आधी ठाकरे ब्रँडची जबरदस्त चर्चा झाली. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येणे किती आवश्यक आहे, यासंदर्भातील बातम्यांचा रतीब घालण्यात आला. निवडणुकीसाठी दोन ठाकरे बंधूंनी युतीही केली. मात्र आता या नात्यात तो ओलावा राहिला आहे का, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. त्याला कारण आहे. स्वीकृत नगरसेवकाची निवड. दोन बंधू एकत्र येत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. पण निवडणूक निकाल आल्यावर मात्र चित्र बदलले.

कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दर्शविला. त्यावरून उबाठा शिवसेनेने टीका केली. पण स् स्वतः उबाठाने चंद्रपूरमध्ये भाजपासोबत जात महापौरपद वाटून घेतले. त्यामुळे दोन बंधूंच्या मिलनाच्या बातम्यांचे कवित्व आता संपले आहे की काय असा सवाल विचारला जात आहे.

मुंबई महानगरपालिकेत उबाठा शिवसेनेचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचे ३ स्वीकृत नगरसेवक निवडून जाऊ शकतात. पण त्यातील एका नगरसेवकासाठी मनसेची मागणी आहे. मात्र उबाठाकडून त्यांना प्रतिसादच मिळालेला नाही. उद्धव ठाकरेंकडून तिन्ही नगरसेवक आपल्याच पक्षाचे पाठविण्याचे ठरले तर मनसेला रिकाम्या हाताने परतावे लागेल. त्यावरून  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक्सवर पोस्ट करत एकप्रकारे चिमटा काढला आहे. तो चिमटा त्यांनी उबाठाला काढला आहे की नाही, हे स्पष्ट होत नसले तरी त्या दिशेने मात्र त्यांची ती पोस्ट आहे, अशी चर्चा आहे.

हे ही वाचा:
शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन
भिवंडी महापौर निवडणुकीत भाजपचे बंडखोर नारायण चौधरींचा विजय
सुशील कुमारच्या जामीन अर्जावर हायकोर्टाची पोलिसांना नोटीस
एआय क्षेत्रात मुकेश अंबानींची १० लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक

ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे साईनाथ दुर्गे, अखिल चित्रे, माधुरी मांजरेकर, प्रमोद शिंदे, हेमंत दुधवडकर, कैलास पाठक, विजय कामठेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. २५ फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली जाणार असल्याचे कळते आहे. जर मनसेला एकही स्वीकृत नगरसेवक पद दिलं नाही तर राज ठाकरेंचा पक्ष काय भूमिका घेणार याबद्दलही राजकारणात उत्सुकता आहे. मध्यंतरी राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामागे हेच कारण आहे का, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. पण ही भेट राजकीय नव्हती असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आता खरे काय हे लवकरच स्पष्ट होईल.

संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, कोत्या मनोवृत्तीच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नयेे.  देशपांडे यांच्या या पोस्टचा रोख उबाठाकडे आहे असे म्हटलेे जात आहे. पण आता प्रत्यक्षात उबाठाकडून मनसेला आपल्या कोट्यातील एक नगरसेवक दिला जाईल का हा प्रश्न आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षांची युती असल्याने या दोन पक्षांच्या युतीला सत्तेत बसण्याचा मान मिळाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत तर मनसेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले असून एमआयएम पक्षाचे ८ नगरसेवक निवडून आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि समाजवादी पक्षाचे २ नगरसेवक यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत.

Exit mobile version