घरराजकारणउमर खालिद, शर्जिल इमामला जामीन नाही!

उमर खालिद, शर्जिल इमामला जामीन नाही!

दिल्ली पोलिसांना नोटीस

२०२० मधील दिल्ली दंगलीशी संबंधित कथित मोठ्या कटाच्या प्रकरणात तुरुंगात असलेले कार्यकर्ते उमर खालिद आणि शरजील इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाने तातडीचा अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांच्या जामीन अर्जांवर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने बुधवारी या प्रकरणाची सुनावणी केली. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याच्या निर्णयाला दोघांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुनावणीदरम्यान दोघांच्या वकिलांनी दीर्घकाळ तुरुंगवासात राहावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करून तातडीने अंतरिम जामीन देण्याची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सध्या ही मागणी मान्य केली नाही आणि आधी दिल्ली पोलिसांची बाजू ऐकून घेण्याचे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणातील कायदेशीर मुद्द्यांचा विचार करून रजिस्ट्रीला संबंधित याचिका प्रशासकीय स्तरावर सरन्यायाधीशांकडे सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात तीन न्यायाधीशांचे मोठे खंडपीठ स्थापन करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

यापूर्वी सहआरोपी तस्लीम अहमद यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये दीर्घकाळ तुरुंगवास आणि खटल्याला होणारा विलंब या कारणांवर जामीन देता येण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठांच्या निरीक्षणांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

सेन्सेक्स १,५०२ अंकांनी उसळला; निफ्टी २५,८०० पार

कुर्ला प्रकरणातील हल्लेखोर अल्पवयीन मुलांचा मदरशाशी संबंध नाही!

आयपीएलच्या लिलावात कोणाला मिळणार ‘भाव’?

गिल-जायस्वालची भरारी, बुमराहची दुसऱ्या स्थानी स्वारी!

उमर खालिद यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. खालिद आणि इमाम यांना जवळपास सहा वर्षांपासून तुरुंगात ठेवण्यात आले असून, खटल्याच्या सुनावणीला होणारा विलंब आणि सुमारे ९०० साक्षीदारांची संख्या लक्षात घेता त्यांना अंतरिम जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद करण्यात आला.

सहआरोपी तस्लीम अहमद यांच्या प्रकरणात दीर्घकाळ तुरुंगवास आणि खटल्याला होणारा विलंब या कारणांवर अंतरिम जामीन देण्यात आला असेल, तर समान परिस्थिती असलेल्या उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या प्रकरणातही त्याच निकषांचा विचार व्हायला हवा, असे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणात स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीच्या अंतरिम जामिनाची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version