बिहारमधील महिलांकडून छठपूजेच्या काळात लावल्या जाणाऱ्या लांब सिंदूराच्या परंपरेची खिल्ली उडवत अश्लील टिप्पणी करणारा स्टँडअप कॉमेडियन यश महेश्वरी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या वक्तव्यामुळे बिहारमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, त्याच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. महेश्वरीने व्हिडिओ प्रसिद्ध करून माफी मागितली असली, तरी त्याच्याविरोधातील रोष कमी झालेला नाही. महेश्वरीविरोधात आता पाटण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बिहार भाजपच्या नेत्या ऋतु जैस्वाल यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यश महेश्वरीविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. बिहारमधील अनेक नागरिकांनीही संपूर्ण समाजाच्या धार्मिक श्रद्धा आणि परंपरांची खिल्ली उडवल्यानंतर केवळ माफी मागणे पुरेसे नसल्याची भूमिका मांडली आहे.
दरम्यान, पाटणा पोलिसांनी बुधवारी यश महेश्वरीविरोधात पाटणा सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५(१), ७९, ३५१ आणि ३५२ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६सी आणि ६६डी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बिहारमधील महिलांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो आणि विविध समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पाटणा पोलिसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यश महेश्वरी याने २१ नोव्हेंबर रोजी आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्टँडअप कॉमेडीचा व्हिडिओ अपलोड केला होता. या कार्यक्रमात त्याने छठपूजेच्या वेळी बिहारमधील महिला लावतात त्या लांब सिंदूराच्या परंपरेची तुलना पुरुषांच्या गुप्तांगाशी केली होती. त्याच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. बिहार पोलीस, दिल्ली पोलीस आणि अन्य कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, योग्य गुन्हे दाखल करावेत आणि कायद्यानुसार शक्य असलेली कठोर कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले.
हे ही वाचा:
कुर्ला प्रकरणातील हल्लेखोर अल्पवयीन मुलांचा मदरशाशी संबंध नाही!
भारतीय फलंदाजांनी जेकब डफीची ‘डफली वाजवली’!
बर्ड फ्लूचा पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका
हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!
सर्वोच्च न्यायालयातील वकील अमिता सचदेवा यांनीही यश महेश्वरी याला कायदेशीर नोटीस बजावल्याचे सांगितले आहे. या नोटीसद्वारे त्याला पालन करण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मॉरली क्वेश्चनेबल | स्टँडअप कॉमेडी’ या शीर्षकाचा वादग्रस्त व्हिडिओ २१ नोव्हेंबर रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यामध्ये महेश्वरीने छठपूजेच्या वेळी बिहारमधील महिला नाकापासून भांगापर्यंत लांब केशरी सिंदूर लावतात, त्या परंपरेची अश्लील शब्दांत खिल्ली उडवली.
इतकेच नव्हे, तर सिंदूर लावलेल्या महिलांची तुलना भगवान हनुमान यांच्याशी करत, आपल्या घराजवळ कोणीतरी हिंदू देवतेसारखे दिसणारे का फिरत आहे, अशा आशयाची टिप्पणीही त्याने केली.
