जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांची संख्या शून्यावर आल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा असून, आता परदेशी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या सुमारे ६५ परदेशी दहशतवादी सक्रिय आहेत. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचे ३५ आणि जैश-ए-मोहम्मदचे २५ दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित दहशतवादी इतर संघटनांशी संबंधित आहेत.
स्थानिक दहशतवाद्यांची संख्या शून्यावर आल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. नुकत्याच कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत स्थानिक दहशतवादी मोहम्मद लतीफ भट मारला गेल्यानंतर हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक तरुणांची दहशतवादी संघटनांमधील भरती जवळपास थांबली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यावर सुरक्षा दलांनी लक्ष केंद्रित केले आहे.
दुर्गम भागांत ८० हून अधिक तात्पुरते तळ
दहशतवाद्यांना डोंगराळ आणि जंगल परिसरात लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणे मिळू नयेत, यासाठी सुरक्षा दलांनी रणनीतीत बदल केला आहे. जम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत ८० हून अधिक तात्पुरते ऑपरेटिंग बेस (TOB) उभारण्यात आले आहेत. यातील काही तळ समुद्रसपाटीपासून १० हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर आहेत. या तळांवर लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांचे जवान तैनात आहेत.
हे ही वाचा:
पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर आरोपीवर गोळीबार करून कोयत्याने हल्ला
हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दीपथूनवर दिवा न लावल्याने वाद
पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त
सुरक्षा यंत्रणांच्या अंदाजानुसार, दहशतवादी जंगल, डोंगरातील गुहा आणि गुराख्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्यांचा म्हणजेच ‘ढोक’चा वापर लपण्यासाठी करत असण्याची शक्यता आहे. दुर्गम भागातील भौगोलिक परिस्थिती आणि दहशतवाद्यांकडून पारंपरिक संपर्क माध्यमांचा मर्यादित वापर यामुळे त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे सुरक्षा दलांकडून स्थानिक गुप्तचर माहिती, संशयितांच्या हालचाली आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ओव्हर ग्राउंड वर्कर्सच्या (OGW) नेटवर्कवर लक्ष ठेवले जात आहे. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस संयुक्तपणे शोधमोहीम राबवत आहेत.
