पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर बुधवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळील चेंबर क्रमांक ६३ बाहेर हा प्रकार घडला. या हल्ल्यात मंदार किवळे हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
माहितीनुसार, पाच ते सहा हल्लेखोर दोन दुचाकींवरून घटनास्थळी आले होते. त्यांच्याकडे कोयते आणि पिस्तूल होते. हल्लेखोरांनी मंदार किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र, गोळ्या त्याला लागल्या नाहीत. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाले. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दीपथूनवर दिवा न लावल्याने वाद
पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त
अमेठीत ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्या १० जणांच्या टोळक्याला अटक
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी स्वतःला कात्रजचे रहिवासी असल्याचे सांगत किवळे याला धमकावले. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करून ते घटनास्थळावरून पसार झाले. न्यायालयाच्या परिसरात मोठी वर्दळ असताना हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख याबाबत तपास सुरू आहे. मंदार किवळे याचा यापूर्वी शुभम चव्हाण हत्या प्रकरणात आरोपी म्हणून समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.
