अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटने क्रिकेटविश्वाला थक्क करत लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ऐतिहासिक द्विशतक झळकावले. मात्र, या विक्रमी खेळीमागे भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंह याचा मोलाचा सल्ला असल्याचे वैभवने सांगितले आहे. यूएई ए संघाविरुद्धच्या सामन्याच्या आदल्या दिवशी युवराजशी झालेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेने आपला आत्मविश्वास वाढल्याचे त्याने स्पष्ट केले.
आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धेत इंडिया ए कडून खेळताना वैभवने यूएई ए विरुद्ध अवघ्या ५३ चेंडूंत २०४ धावांची तुफानी खेळी केली. त्याने २८ षटकार आणि ७ चौकार ठोकले. अवघ्या २८ चेंडूंत शतक आणि ५२ चेंडूंत द्विशतक पूर्ण करत त्याने लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक आणि द्विशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला.
या ऐतिहासिक खेळीनंतर बीसीसीआय टीव्हीशी बोलताना वैभवने आपल्या यशामागील युवराजच्या मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख केला. सामन्याच्या आदल्या दिवशी त्याने वडील, बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा, अंडर-१९ मधील मित्र प्रथम जाचक आणि युवराज सिंह अशा चार जणांशी संवाद साधला होता.
वैभव म्हणाला, की युवराजशी जवळपास अर्धा तास चर्चा झाली. फलंदाजी करताना येणाऱ्या अडचणी आणि तांत्रिक चुका याबद्दल त्याने युवराजशी मोकळेपणाने चर्चा केली. मागील काही सामन्यांत धावा होत नसल्यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला होता. अशा परिस्थितीत आपल्या आदर्श खेळाडूशी बोलल्यामुळे त्याला मोठा आधार मिळाला.
युवराजने त्याच्या फलंदाजीतील चुका समजावून सांगितल्या. विशेषतः २० चेंडू खेळण्यावर लक्ष केंद्रित केले असते तर धावसंख्या वेगळी झाली असती, असे युवराजने त्याला सांगितले. काही तांत्रिक बाबीही समजावून दिल्या. वैभवने आपल्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर युवराजने सांगितलेल्या चुका त्याच्या लक्षात आल्या.
सामन्यात उतरल्यावर युवराजने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम मैदानावर दिसून आला. आपल्या आदर्श खेळाडूचा सल्ला ऐकून त्यानुसार खेळल्याचा फायदा झाल्याचे वैभवने सांगितले.
