घरबिजनेससेन्सेक्स १,५०२ अंकांनी उसळला; निफ्टी २५,८०० पार

सेन्सेक्स १,५०२ अंकांनी उसळला; निफ्टी २५,८०० पार

शेअर बाजारात तुफान तेजी

आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने बुधवारी जोरदार पुनरागमन केले. गुंतवणूकदारांनी बँकिंग, एफएमसीजी, आयटी आणि फार्मा क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १,५०२.२९ अंकांनी म्हणजेच १.८२ टक्क्यांनी वधारून ८३,९३८.२८ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४६९.६० अंकांची वाढ नोंदवत २५,८१९.२५ अंकांवर पोहोचला. निफ्टीमध्ये १.८५ टक्क्यांची वाढ झाली. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने ८४,४९८ अंकांची तर निफ्टीने २५,९५१ अंकांची उच्चांकी पातळी गाठली.

या तेजीमध्ये एफएमसीजी क्षेत्राने सर्वाधिक आघाडी घेतली. हिंदुस्तान युनिलिव्हरचा समभाग जवळपास ६ टक्क्यांनी वधारला. याशिवाय ट्रेंट, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडिगो आणि बजाज फायनान्सच्या समभागांमध्येही चांगली खरेदी दिसून आली. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील तेजीने बाजाराला मोठा आधार दिला. दुसरीकडे टाटा स्टील, हिंडाल्को आणि काही धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली. एफएमसीजी आणि खासगी बँकिंग क्षेत्रातील समभाग गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरले असताना मीडिया आणि मेटल क्षेत्र मात्र दबावाखाली राहिले.

हे ही वाचा:
हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!

खासगी गुंतवणुकीत सहा महिन्यांत २६.६ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

ऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप

पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त

बाजारातील तेजीमागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली खरेदी, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि रुपयातील सुधारणा ही महत्त्वाची कारणे मानली जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे भारताच्या आयात खर्चावरील दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे. याचा सकारात्मक परिणाम महागाई, कंपन्यांचा उत्पादन खर्च आणि अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. जागतिक गुंतवणूकदारांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील गुंतवणुकीतून काही प्रमाणात पैसा इतर बाजारांकडे वळत असल्याचाही भारतीय बाजाराला फायदा होत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

या तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवलही वाढले. एका सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांहून अधिक भर पडली. मात्र, बाजारातील ही तेजी कायम राहीलच असे नाही. जागतिक आर्थिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांचा कल यावर पुढील बाजाराची दिशा अवलंबून असेल. त्यामुळे सध्याच्या तेजीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version