उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. उन्नाव येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना महाना कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या घटनेवरून काँग्रेसने महाना तसेच भाजपाने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
उन्नाव येथील एका महाविद्यालयात प्रिन्सिपल्स कौन्सिलच्या प्रांतीय अधिवेशन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सतीश महाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांकडून त्यांना नियमानुसार ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान महाना काही क्षण उभे राहिल्यानंतर कार्यक्रमस्थळावरून खाली उतरून आपल्या वाहनाच्या दिशेने जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
हे हे वाचा:
महाराष्ट्रात खासगी कोचिंग, ट्युशन क्लासेसवर येणार नियंत्रण
दुसऱ्या कसोटीतही पडिक्कलचे शतक
काँग्रेसच्या कर्नाटकात अदानी देतायत नोकऱ्या!
गुरुवायूर मंदिरात विवाहांचा नवा विक्रम; एकाच दिवशी ४१६ जोडपी विवाहबद्ध
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने महाना यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी या घटनेवर प्रश्न उपस्थित करत राष्ट्रगीतासाठी अवघे ५२ सेकंद थांबता आले नाहीत का, असा सवाल केला. राष्ट्रगीताचा सन्मान हा पक्षीय राजकारणापेक्षा मोठा विषय असल्याचे सांगत त्यांनी सतीश महाना आणि भाजपाने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही महाना यांच्या कृतीवर आक्षेप घेतला.
समाजवादी पक्षानेही या प्रकरणावरून भाजपाला लक्ष्य केले. राष्ट्रगीत आणि देशभक्तीच्या मुद्द्यावर इतर पक्षांना उपदेश देणाऱ्या भाजपाने आता आपल्या नेत्याच्या कृतीबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली. आम आदमी पक्षानेही व्हिडीओ शेअर करत महाना यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सतीश महाना यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे. ज्या ठिकाणी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला, त्या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवण्यात आले नव्हते, असा त्यांचा दावा आहे. गार्ड ऑफ ऑनरच्या वेळी राष्ट्रगीत वाजवण्याची पद्धत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रगीत कार्यक्रमस्थळी सुरू होते; मात्र आपण त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो, असे महाना यांनी सांगितले. कार्यक्रमातून बाहेर पडताना राष्ट्रगीत सुरू असल्यास प्रत्येकाने तिथेच थांबून उभे राहणे अपेक्षित आहे का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.
