केरळ आणि आखाती देशांचे संबंध गेल्या अनेक दशकांपासून प्रामुख्याने परदेशातून येणाऱ्या पैशांशी जोडले गेले आहेत. आखाती देशांमध्ये काम करणारे मल्याळी (प्रामुख्याने मुस्लिम), त्यांच्या कमाईतून उभी राहिलेली घरे आणि कुटुंबांच्या बदललेल्या आर्थिक परिस्थितीच्या कथा मोठ्या प्रमाणावर सांगितल्या जातात. मात्र, जागतिक बँकेच्या एका अभ्यासाने या स्थलांतराचा एक वेगळा आणि चिंताजनक पैलू समोर आणला आहे. अभ्यासानुसार, सौदी अरेबियातून केरळमध्ये परतलेल्या काही स्थलांतरित पुरुषांमध्ये (मुस्लिम) महिलांविरुद्ध हिंसाचार आणि पारंपरिक लैंगिक भूमिकांबाबत अधिक पुराणमतवादी विचार आढळले. मार्च २०२२ मध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यास अलीकडे चर्चेत आला आहे.
या निष्कर्षांवर काँग्रेसचे तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी चिंता व्यक्त केली असून, केरळच्या मुस्लिम समाजात याबाबत गंभीर आत्मपरीक्षण आणि अंतर्गत चर्चा होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
जागतिक बँकेच्या अभ्यासाचे शीर्षक ‘बियॉन्ड मनी: डझ मायग्रेशन एक्सपिरियन्स ट्रान्सफर जेंडर नॉर्म्स? एम्पिरिकल एव्हिडन्स फ्रॉम केरळ, इंडिया’ असे आहे. स्थलांतरित व्यक्ती केवळ पैसा आणि आर्थिक संसाधनेच मायदेशी घेऊन येतात का, की ज्या देशात ते राहतात तेथील सामाजिक मूल्ये आणि विचारसरणीही त्यांच्या मूळ समाजात परत आणतात, हा या अभ्यासाचा मुख्य प्रश्न होता.
संशोधकांनी केरळ स्थलांतर सर्वेक्षण २०१३मधील माहितीचा वापर केला. या सर्वेक्षणात केरळमधील सर्व १४ जिल्हे आणि ६३ तालुक्यांतील १४,५७५ कुटुंबे आणि ६३,२३० कुटुंबीयांची माहिती घेण्यात आली होती. अभ्यासासाठी सौदी अरेबियातून परतलेले २५६ स्थलांतरित, इतर आखाती देशांतून परतलेले ३२२ स्थलांतरित आणि स्थलांतराचा अनुभव नसलेले ८,६१४ नागरिक यांची तुलना करण्यात आली.
सौदी अरेबियाचा स्वतंत्र गट करण्यात आला. महिलांच्या भूमिका आणि सामाजिक नियमांच्या बाबतीत तेथील सामाजिक वातावरण तुलनेने अधिक पुराणमतवादी असल्याचे संशोधकांनी नमूद केले. अभ्यासात रोजगार, सर्वसाधारण लैंगिक समानतेचे विचार, कुटुंबातील निर्णयप्रक्रिया, महिलांविरुद्ध हिंसाचार आणि अत्यंत पुराणमतवादी लैंगिक विचार अशा पाच निकषांवर अभ्यास करण्यात आला. सौदी अरेबियातून परतलेल्या स्थलांतरितांमध्ये स्थलांतराचा अनुभव नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत काही बाबतीत मोठा फरक दिसून आला.
हे ही वाचा:
दिल्ली पावसाने बेहाल; रस्ते जलमय, विमानसेवाही कोलमडली
३० हजार कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ रॅकेटप्रकरणी मुंबईत दोघांना अटक
राष्ट्रगीत सुरु असताना उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष निघून गेल्याचा आरोप
बांगलादेशात गॅस संपला; कारखाने बंद, कामगार घरी
अभ्यासातील काही सर्वेक्षण प्रश्नांवरील उत्तरे विशेष चर्चेत आली आहेत. सौदी अरेबियातून परतलेल्या स्थलांतरितांपैकी ४३ टक्के जणांनी पत्नीने पतीचे म्हणणे न ऐकल्यास पतीला तिला मारण्याचा अधिकार आहे, या विधानाशी सहमती दर्शवली. इतर आखाती देशांतून परतलेल्या स्थलांतरितांमध्ये हे प्रमाण ३७ टक्के होते. महिलांच्या घराबाहेर जाण्याच्या स्वातंत्र्याबाबतही मोठा फरक दिसून आला. सौदीतून परतलेल्या स्थलांतरितांपैकी ७५.३ टक्के जणांचे मत होते की पत्नी किंवा मुलगी घराबाहेर मुक्तपणे फिरत असेल तर पुरुषाचा समाजातील आदर कमी होतो. इतर आखाती देशांतून परतलेल्या स्थलांतरितांमध्ये हे प्रमाण ६७.७ टक्के होते.
जागतिक बँकेचा अभ्यास पुन्हा चर्चेत आल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. केरळमध्ये इस्लामची उदारमतवादी आणि प्रगतिशील परंपरा असून, मुस्लिम मुली आणि महिलांच्या शिक्षणाबाबत राज्याचा इतिहास अभिमानास्पद असल्याचे थरूर यांनी म्हटले. परदेशातून अधिक पुराणमतवादी आणि प्रतिगामी विचार व प्रथा केरळमध्ये येत असतील, तर ते केरळच्या सामाजिक परंपरांशी विसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले. या विषयावर मुस्लिम समाजात गंभीर आत्मपरीक्षण आणि अंतर्गत चर्चा होण्याची गरज असल्याचेही थरूर यांनी सांगितले.
सोमवारी तिरुवनंतपुरम येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांचे वक्तव्य कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाकडून काही मागण्याच्या उद्देशाने नसून, समाजाने या निष्कर्षांवर विचार करावा यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
