उत्तर भारतात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी (२४ ऑगस्ट) मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले. दिल्लीसोबतच नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबाद या भागांनाही पावसाचा मोठा फटका बसला. अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली, तर विमानसेवेवरही परिणाम झाला.
मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. २५० हून अधिक विमानांना विलंब झाला, तर दिल्लीकडे येणारी १५ विमाने अन्य विमानतळांकडे वळवण्यात आली. यामध्ये दोन आंतरराष्ट्रीय विमानांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. खराब हवामानामुळे विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानाचे वेळापत्रक तपासूनच विमानतळाकडे रवाना होण्याचा सल्ला दिला.
पावसामुळे दिल्ली-एनसीआरमधील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. परिणामी वाहनांचा वेग मंदावला आणि विविध भागांत मोठी वाहतूक कोंडी झाली. कार्यालयीन वेळेत पावसाचा जोर वाढल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मान्सूनची हालचाल सध्या सक्रिय आहे. २० ते २४ ऑगस्टदरम्यान मान्सूनचा नवा टप्पा सक्रिय होण्याचा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाने व्यक्त केला होता. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाला चालना मिळाली असून त्याचा प्रभाव उत्तर भारतापर्यंत जाणवत आहे.
हे ही वाचा:
काश्मिरी पंडितांची नाव-पत्त्यासह नंबर असलेली यादी दहशतवाद्यांकडून जारी
३० हजार कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ रॅकेटप्रकरणी मुंबईत दोघांना अटक
वंधामातील २३ काश्मिरी पंडितांच्या हत्येचे गूढ उलगडणार?
बलुचिस्तानात पाक सैन्यावर हल्ला; १३ ठार
दिल्ली-एनसीआरसोबतच उत्तराखंड, ओडिशा आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ओडिशातील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे वाहतूक आणि हवाई सेवा विस्कळीत झाली असली, तरी मंगळवारपर्यंत पावसाची शक्यता कायम असून त्यानंतर काही दिवस पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
