घरस्पोर्ट्सकुस्तीचा वारसा, तीन सुवर्णपदकांचा इतिहास

कुस्तीचा वारसा, तीन सुवर्णपदकांचा इतिहास

भारताच्या महिला कुस्तीतील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेतील खेळाडूंपैकी एक असलेल्या विनेश फोगाट हिने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली. कॉमनवेल्थ गेम्समध्ये तीन सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलेल्या विनेशच्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक क्षण आले. मात्र, तिच्या कुस्ती कारकिर्दीइतकेच तिचे नाव विविध वादांमुळेही चर्चेत राहिले.

विनेशचा जन्म २५ ऑगस्ट १९९४ रोजी हरियाणातील बलाली गावात झाला. कुस्तीचा वारसा तिला कुटुंबातूनच मिळाला. तिचे ताऊ आणि प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंह फोगाट यांनी लहानपणापासूनच विनेशला कुस्तीचे धडे दिले. चुलत बहिणी गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांच्या पावलावर पाऊल ठेवत विनेशनेही कुस्तीच्या आखाड्यात प्रवेश केला.

मात्र, तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. विनेश अवघ्या ९ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर महावीर फोगाट यांनी तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. पहाटे पाच वाजता उठून कठोर सराव करणे आणि त्यानंतर शाळेत जाणे, असा तिचा दिनक्रम होता. या कठोर मेहनतीनेच पुढे तिच्या यशाचा पाया मजबूत केला.

कॉमनवेल्थमध्ये सुवर्णयशाची हॅट्ट्रिक

विनेशला आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले मोठे यश २०१४च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मिळाले. त्यानंतर रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली; मात्र पदकापासून तिला दूर राहावे लागले.

यानंतर विनेशने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. २०१८च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकत तिने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. त्याच वर्षी एशियन गेम्समध्येही तिने सुवर्णपदकावर नाव कोरले.

विनेशने विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवण्यासोबतच आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकले. २०२२च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने पुन्हा सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्समध्ये तीन सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होण्याचा मान तिला मिळाला.

कुस्ती महासंघाविरोधातील आंदोलनानेही गाजले नाव

विनेशच्या कारकिर्दीत वादही मोठ्या प्रमाणावर आले. २०२३मध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत विनेशने बजरंग पुनिया आणि अन्य कुस्तीपटूंसोबत दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाने देशभरात मोठी चर्चा निर्माण झाली.

पॅरिस ऑलिम्पिकमधील धक्कादायक अपात्रता

विनेशच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये बसला. महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी वजन करताना तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅमने अधिक आढळले. त्यामुळे तिला अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले. अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे तिचे किमान रौप्यपदक निश्चित झाले होते; मात्र अपात्रतेमुळे तिच्या हातातून पदकही निसटले.

या निर्णयाविरोधात विनेशने क्रीडा लवादाकडे दाद मागितली. या संपूर्ण प्रकरणामुळे भारतीय क्रीडा विश्वात मोठी चर्चा झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version